सकाळचे पहाटेचं वातावरण हे शांतता आणि नव्या दिवसाची सुरुवात असते. अशा वेळेस आपण आपल्या आवडत्या देवाचे नाव घेऊन दिवसाची सुरूवात करतो. पण काही घरांमध्ये असा एक विचित्र नियम पाळला जातो की सकाळी उठल्यावर सर्वात आधी हनुमानजींचं नाव घेऊ नये. लोक म्हणतात की जर असं केलं, तर दिवसभर उपाशी राहावं लागेल. हा विश्वास खरंच इतका गूढ आहे का? का यामागे काही भावनिक आणि धार्मिक भावना दडल्या आहेत?

खरं तर हनुमानजी हे भक्ती आणि शक्तीचं एक अद्वितीय प्रतीक आहेत. त्यांचं नाव घेतलं की माणसाच्या मनाला वेगळाच धीर येतो. तरीही, काही लोक सकाळी उठल्याबरोबर त्यांचं नाव घेण्यापासून थांबतात. यामागे एक जुनी परंपरा आणि काही पौराणिक संदर्भ आहेत, जे समजून घेतल्यावर ही गोष्ट अंधश्रद्धा वाटत नाही, तर एक गहन भक्तिभाव वाटतो.
ज्योतिषशास्त्रात हनुमानजींना मंगळ ग्रहाशी जोडलेलं मानलं जातं. मंगळ बलवान असेल तर माणसाच्या आयुष्यात यश मिळण्याची शक्यता वाढते. म्हणूनच हनुमान चालिसा, त्यांच्या नावाचा जप हे सर्व मंगळ बलवत्तर करण्यासाठी केले जाते. पण याच हनुमानजींच्या बाबतीत असं का सांगितलं जातं की सकाळी सर्वात आधी त्यांचं नाव घेणं टाळावं?
हनुमानही काय म्हणाले होते?
या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे त्यांच्या नम्रतेत. सुंदरकांडमधील एक घटना यासंदर्भात महत्त्वाची आहे. हनुमानजी जेव्हा लंकेत सीतेचा शोध घेत होते, तेव्हा त्यांची भेट विभीषणशी झाली. रामाच्या गुणगौरवाने भारावलेले विभीषण हनुमानजींची ओळख विचारतात. तेव्हा हनुमानजी त्यांना सांगतात, “जो सकाळी माझं नाव सर्वप्रथम घेतो, त्याला त्या दिवशी अन्न मिळणार नाही.”
हे वाक्य ऐकून अनेकांना आश्चर्य वाटतं. पण यामागचा खरा अर्थ असा की हनुमानजी कधीच स्वतःचं महत्त्व मांडत नाहीत. त्यांच्या दृष्टीने भगवान राम हेच सर्वस्व आहेत. ते स्वतःला नेहमीच रामभक्त म्हणूनच ओळखून घेतात.
…म्हणून भक्तांनी सकाळी बजरंगबलीचे नाव घेऊ नये
याच कारणामुळे त्यांनी विभीषणाला ही ताकीद दिली की रामाच्या नावाच्या आधी त्याचं नाव येऊ नये. त्यांच्या हृदयात रामाचं स्थान इतकं खोल आहे की त्यांनी स्वतःच्या नावाच्या पूजेलाही कधी महत्त्व दिलं नाही.
आज जगभरात लाखो लोक हनुमानजींची पूजा करतात, त्यांचं नाव अखंड जपत राहतात. पण तरीही, खऱ्या भक्ताने हे समजून घेतलं पाहिजे की हनुमानजींच्या मते, खऱ्या भक्तीची सुरुवात रामाच्या नामस्मरणाने व्हायला हवी. कारण हनुमान हे भक्तीतून जन्मलेले देव आहेत आणि त्यांच्या भक्तीचा शिरोमणी म्हणजे श्रीराम. म्हणूनच त्यांचं नाव घेण्याआधी, हनुमानजींच्या इच्छेप्रमाणे, त्यांचे आराध्य श्रीरामचं नाव घ्यावं, हेच त्यांच्यावरील खरं प्रेम ठरेल.