क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंच्या कामगिरीने जितकी उत्सुकता निर्माण होते, तितकीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही सतत चर्चा रंगत असते. काही खेळाडूंच्या प्रेमकथाही चाहत्यांना भारावून टाकतात. क्रिकेटच्या या रंगमंचावर अशा काही प्रेमकथा घडल्या ज्या अगदी आपल्या घराघरात घडाव्यात इतक्या साध्या आणि मनाला स्पर्श करणाऱ्या आहेत. खास करून अशा खेळाडूंच्या, ज्यांनी आपल्या खास मित्राच्या बहिणीशीच लग्न करून त्याच मैत्रीत आणखी एक अटूट नातं जोडून टाकलं.

अक्रम खान आणि फारुक अहमद
बांगलादेशचा माजी कर्णधार अक्रम खान आणि माजी खेळाडू फारुक अहमद या दोघांच्या नातेसंबंधाने क्रिकेटपेक्षाही जास्त चर्चा निर्माण केली. अक्रमने सबिनाशी लग्न केलं आणि फारुकने शाहरियाशी. गंमत म्हणजे या दोघी बहिणीच आहेत. अक्रम आणि फारुक एकाच पिढीतील खेळाडू, एकमेकांचे नातेवाईक आणि आता मेहुणेसुद्धा.
उमर अकमल
पाकिस्तानचा उमर अकमल देखील या यादीत आहे. त्याने आपल्या क्रिकेट सहकारी अब्दुल कादिरची मुलगी आणि उस्मान कादिरची बहीण नूर आमनशी विवाह केला. हे नातं केवळ वैयक्तिक नव्हे, तर दोन क्रिकेट कुटुंबांना एकत्र आणणारं ठरलं.
अजित आगरकर
भारताकडे पाहिलं, तर अजित आगरकरचं फातिमा घडियालीशी झालेलं लग्न देखील असंच एक उदाहरण आहे. फातिमा ही अजितचा जवळचा मित्र मजहर घडियालीची बहीण. अजित आणि मजहरने मुंबईसाठी एकत्र क्रिकेट खेळलं आणि ही मैत्री एक सुंदर नात्यात परावर्तित झाली.
मार्क बुचर
कधी कधी अशा कथा परदेशातही पाहायला मिळतात. इंग्लंडचा खेळाडू मार्क बुचरने आपल्या सहकारी अॅलेक स्टीवर्टची बहीण ज्युडीशी लग्न केलं. त्यांचं नातं सरे क्लबमध्ये एकत्र खेळताना फुललं. तर ऑस्ट्रेलियाचा डॅरेन लेहमनने इंग्लंडच्या क्रेग व्हाईटची बहीण अँड्रियाशी लग्न करत एक वेगळी क्रिकेटीय मैत्री कौटुंबिक बंधनात रूपांतरित केली.
हार्दस विल्जोएन, गुंडप्पा विश्वनाथ
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज हार्दस विल्जोएन आणि फाफ डू प्लेसिसची बहीण रेमी यांची कहाणी देखील अशीच एका खास आठवणीप्रमाणे आहे. या यादीत एक अनमोल नाव म्हणजे गुंडप्पा विश्वनाथ. 1978 मध्ये त्यांनी सुनील गावस्कर यांची बहीण कविता यांच्याशी लग्न केलं आणि क्रिकेटमधील दोन महान भारतीय घराणी एकत्र आली. गावस्कर आणि विश्वनाथ मैदानावर एकत्र खेळणारे आणि मैदानाबाहेर एकाच कुटुंबाचे भाग बनले.
या साऱ्यांच्या कथा म्हणजे मैत्री, विश्वास, प्रेम आणि नात्यांची एक भावनिक गुंफण. कधी मैत्रीतून प्रेम निर्माण झालं, कधी खेळाच्या मैदानावरून आयुष्याचा साथीदार सापडला. हे खेळाडू केवळ क्रिकेटमुळे नाही, तर आपल्या प्रेमाच्या नात्यांमुळेही आठवले जातात.