बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित आजही लाखो हृदयांवर राज्य करते. तिच्या हास्याने आणि नृत्याच्या लयबद्ध अदांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केल्यानंतर, 1999 साली तिने अमेरिकन हृदयरोगतज्ज्ञ डॉ. श्रीराम नेने यांच्याशी विवाह केला आणि अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. तिचा हा निर्णय केवळ अभिनयविश्वात नवा वळण घेणारा नव्हता, तर तिच्या आयुष्याच्या प्रवासालाही एक नवे वळण देणारा ठरला.

लग्नानंतर काही काळ माधुरीने बॉलिवूडपासून स्वतःला दूर ठेवले. अमेरिकेत स्थायिक होऊन ती पत्नी, आई आणि गृहिणीची भूमिका पार पाडू लागली. पण अभिनयाची ओढ ही अशी काही असते की, ती हृदयाच्या कोपऱ्यातूनही सतत साद घालत राहते. त्यामुळेच 2007 मध्ये ‘आजा नचले’च्या माध्यमातून तिने पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दमदार पुनरागमन केले.
माधुरी दीक्षितची संपत्ती
आज माधुरी केवळ अभिनेत्री म्हणून नाही, तर एक उद्योजिका, ब्रँड अॅम्बेसेडर आणि टीव्ही शो जज म्हणूनही मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. एका चित्रपटासाठी ती 4 ते 5 कोटी रुपये घेत असल्याची चर्चा आहे. याशिवाय, रिअॅलिटी शोजमध्ये जज म्हणून तिचं मानधन तब्बल 10 कोटी रुपये असल्याचं समजतं. तिची एकूण संपत्ती सुमारे 250 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे.
डॉ. श्रीराम नेने यांची संपत्ती
दुसरीकडे, डॉ. श्रीराम नेने हे केवळ माधुरीचे पती नसून, स्वतःच्या क्षेत्रात एक यशस्वी नाव आहेत. अमेरिकेत हृदयरोग सर्जन म्हणून त्यांनी एक प्रभावी करिअर घडवलं. भारतात परतल्यानंतर त्यांनी Pathfinder Health Sciences नावाची आरोग्यविषयक डिजिटल स्टार्टअप सुरू केली, जी हेल्थटेक क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करत आहे. त्यांच्या कौशल्यामुळे आणि वैद्यकीय अनुभवामुळे ते आजही महिन्याला सुमारे 7 लाख रुपये कमावतात. त्यांच्या एकूण संपत्तीचा अंदाज सुमारे 100 कोटी रुपये आहे.
संपत्तीच्या दृष्टीने पाहिलं तर माधुरी तिच्या पतीपेक्षा अधिक श्रीमंत आहे. मात्र, आर्थिक यशापलीकडे दोघांचं नातं विश्वास, प्रेम आणि समजुतीवर आधारलेलं आहे. मुंबईतील त्यांचं 5,500 चौरस फूटाचं सी-फेसिंग आलिशान अपार्टमेंट त्यांच्या समृद्ध जीवनशैलीचं प्रतीक आहे, जिथे ते त्यांच्या दोन मुलांसह एक सुंदर कौटुंबिक आयुष्य जगत आहेत.