घरी गरमागरम डोसा बनवण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. पण कित्येकदा नॉन-स्टिक तवा नसल्यामुळे डोसा तव्याला चिकटतो, आणि सगळा मूडच खराब होतो. अशा वेळी, नॉन-स्टिक तवा विकत घेण्यापेक्षा घरात असलेल्या लोखंडी तव्यालाच नॉन-स्टिकसारखं कसं बनवायचं, याचा एक सोपा आणि स्वस्त उपाय अनेकांसाठी खूप उपयोगी ठरू शकतो. आज आपण अशाच एका खास जुगाडबद्दल बोलणार आहोत, जो तुमच्या जुन्या लोखंडी तव्यालाही नवा जीव देईल.

आपल्या घरात वापरली जाणारी लोखंडी भांडी म्हणजे एक प्रकारचा वारसाच असतो. यात बनवलेलं अन्न चविष्ट लागतं, पण थोडी काळजी न घेतल्यास त्यावर पराठा, डोसा, किंवा अगदी धिरडे ही नीट भाजत नाही. अन्न तव्याला चिकटतं आणि स्वयंपाकाचा अनुभव त्रासदायक होतो.
विशेषतः डोसा करताना तवा योग्य तापमानात नसेल, किंवा नीट तेल लावले नसेल, तर त्याचा अगदी चोथा होतो. अशा वेळेस काहीजण नॉन-स्टिक तव्याचा पर्याय शोधतात, पण ते भांडे महाग आणि नाजूक असते.
जाणून घ्या घरगुती उपाय
मात्र, एक घरगुती आणि खर्चिक नसलेला उपाय असा आहे की, तुमचा लोखंडी तवाच नॉन-स्टिकसारखं वागायला लागतो. त्यासाठी वेगळं काही खरेदी करण्याची गरज नाही. फक्त मोहरीचं तेल आणि थोडा वेळ तुमच्याकडे असेल, की तुमचं काम काही मिनिटांत होतं.
सर्वप्रथम, तवा नीट स्वच्छ करा. जुना तेलकटपणा, चिकटपणा काढून टाका. तवा कोरडा झाल्यावर गॅसवर ठेवा आणि तो व्यवस्थित तापू द्या. त्यानंतर त्यावर 2 ते 3 चमचे मोहरीचं तेल घालून संपूर्ण पृष्ठभागावर नीट पसरवा. थोड्या वेळाने पॅनमधून धूर यायला लागेल आणि तुमच्या लक्षात येईल की त्यावर एक जाडसर, पण मऊसर लेप तयार झाला आहे जणू नॉन-स्टिक कोटिंगचं घरगुती रूप.
तेलाचा धूर थांबल्यावर गॅस बंद करा आणि तवा थोडा थंड होऊ द्या. हे झालं की तवा वापरण्यास तयार आहे. तुम्ही यावर अगदी आरामात डोसा, चिल्ला किंवा पराठा तयार करू शकता. काहीही चिकटणार नाही, आणि चवही अफलातून लागेल.