तुम्ही कल्पना करू शकता का की जगात एक असं बेट आहे जिथे पुरुषांना पाऊलही ठेवू दिलं जात नाही? होय, हे खरं आहे! फिनलंडच्या रम्य समुद्रकिनाऱ्यालगत वसलेलं “सुपरशी बेट” हे असंच एक अद्वितीय ठिकाण आहे, जे फक्त आणि फक्त महिलांसाठी आहे. या बेटावर पुरुषांच्या उपस्थितीवर कडक बंदी आहे. पण ही बंदी केवळ नियम म्हणून नाही, तर एक मोठं सामाजिक आणि मानसिक स्वातंत्र्य देण्याच्या हेतूनं लावण्यात आली आहे.

सुपरशी बेट
या बेटाची स्थापना अमेरिकन उद्योजिका क्रिस्टीना रोथ यांनी केली. त्यांना वाटत होतं की महिला अनेकदा आपल्या दैनंदिन आयुष्यात इतक्या अडकून पडतात की स्वतःसाठी वेळ काढणं त्यांच्या साठी अशक्य होऊन बसतं. शिवाय, पुरुषांची सततची उपस्थिती ही काही महिलांना अस्वस्थही करते. म्हणूनच त्यांनी असं ठिकाण तयार केलं जेथे स्त्रिया कोणत्याही सामाजिक दबावाशिवाय, निर्भयपणे आणि मनापासून विश्रांती घेऊ शकतील.
सुपरशी बेट हे फिनलंडमधील रासेपोरी जवळ वसलेलं आहे आणि सुमारे 8.4 एकर क्षेत्रफळात पसरलेलं आहे. इथं आलिशान व्हिला, आधुनिक कॉटेजेस, निळ्याशार समुद्राचं सौंदर्य, हिरवळ आणि मनःशांती देणारं निसर्गाचं सान्निध्य हे सगळं एकत्र अनुभवायला मिळतं.
बेटावरील खास इव्हेंट्स
या बेटावर महिलांसाठी खास योगा सेशन्स, ध्यान, मसाज, आरोग्य कार्यशाळा, वेलनेस स्पा आणि नेटवर्किंग इव्हेंट्स आयोजित केले जातात. त्यामुळे तणाव कमी होतो, आणि महिलांना स्वतःशी पुन्हा एकदा जोडून घेता येतं. हे ठिकाण केवळ एक सुट्टीचं स्थान नाही, तर मानसिक आणि आत्मिक पुनरुज्जीवन देणारा अनुभव आहे.
मात्र, सुपरशी बेटावर जाणं काहीसं कठीण आहे. कोणालाही थेट परवानगी दिली जात नाही. इच्छुक महिलांना एक अर्ज भरावा लागतो आणि त्यात त्यांना हे सांगावं लागतं की त्यांना तिथं का जायचं आहे, तिथं राहून त्यांना काय मिळणार आहे, आणि त्यांना त्याची गरज का वाटते. हे संपूर्ण ठिकाण निवडक महिलांसाठी खुले असतं, ज्यांना खऱ्या अर्थाने स्वतःच्या आत डोकावून बघायचं आहे.