भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्त होऊन आता बरीच वर्ष झाली आहेत. मात्र, तो अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंगचे नेतृत्व करतो. त्यामुळे क्रिकेट जगतात त्याची नेहमीच चर्चा असते. मात्र, सध्या धोनी त्याच्या कमाईच्या आकड्यांमुळे चर्चेत आलाय. 2025 मध्ये एमएस धोनीच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, ही वाढ केवळ क्रिकेटमुळे नाही, तर क्रिकेटबाहेर त्याने आखलेल्या काटेकोर योजना, गुंतवणुकीचे निर्णय आणि ब्रँडिंग यामुळे झाली आहे.

‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीने गेल्या आठवड्यात त्याचा 44 वा वाढदिवस साजरा केला आणि या निमित्ताने पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष त्याच्याकडे वळलं. भारतीय क्रिकेट संघात कर्णधार म्हणून त्याने घडवलेली विजयी कहाणी जितकी थरारक आहे, तितकंच प्रेरणादायक आहे त्याचं निवृत्तीनंतरचं जीवन.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2020 मध्ये निवृत्त झाल्यानंतरही तो अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी मैदानावर उतरतो आणि तीच जुन्या काळातील चपळता दाखवतो. या आयपीएल हंगामातही CSK ने त्याला 4 कोटी रुपयांत कायम ठेवले, आणि हेच सांगून गेलं की धोनी अजूनही ‘बिग डील’ आहे.
धोनीची एकूण संपत्ती
धोनीने केवळ क्रिकेटच्या माध्यमातून कमाई केली नाही, तर त्याने आपली ओळख ब्रँडमध्ये रूपांतरित केली. त्याची एकूण संपत्ती आता 1,000 कोटींहून अधिक असून त्यात BCCI कडून मिळालेला 50 कोटींपेक्षा जास्त पगार, 2008 ते 2025 पर्यंत IPL मधून मिळालेले 192.84 कोटी रुपये, आणि दरमहा मिळणारी 70,000 रुपयांची पेन्शन हाही भाग आहे. त्याने 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 सामने खेळून मिळवलेली ही संपत्ती आता त्याच्या प्रगल्भ गुंतवणुकीतून वाढते आहे.
जाहिरातींमधून मोठी कमाई
धोनीच्या संपत्तीचा एक मोठा भाग जाहिरातींमधून येतो. SBI, Mastercard, Jio Cinema, Oppo, WinZO अशा जवळपास 24 नामांकित ब्रँड्ससोबत त्याचे करार आहेत. दरमहा त्याचे उत्पन्न सुमारे 4 ते 5 कोटी रुपये आहे, जे त्याच्या व्यवसाय आणि जाहिराती यांच्यामधून येते.
व्यवसाय क्षेत्र
क्रीडाजगतातील कारकीर्द संपल्यानंतर धोनीने व्यवसाय क्षेत्रात सुद्धा आपला ठसा उमठवला. खाताबुक, गरुड एरोस्पेस, शाका हॅरी आणि Cars24 यांसारख्या स्टार्टअप्समध्ये त्याने लक्षपूर्वक गुंतवणूक केली. 2016 मध्ये ‘SEVEN’ या फिटनेस ब्रँडची सुरुवात त्याने केली, ज्याचा तो सह-संस्थापक आहे. याशिवाय, EMotorad आणि Togdaraho यांसारख्या नवीन उद्योगांमध्येही धोनीचा सहभाग आहे.
फार्महाऊसपासून हॉटेलपर्यंत धोनीने विविध क्षेत्रांत पाऊल टाकले आहे. रांचीजवळ असलेलं 43 एकरचं फार्महाऊस त्याच्या शेतीप्रेमाचं प्रतीक आहे. तिथे स्ट्रॉबेरीपासून ते कडकनाथ कोंबडीपालनापर्यंत अनेक सेंद्रिय उपक्रम चालवले जातात. ही कोंबडी सुमारे 1,000 रुपये प्रति किलो विकली जाते, आणि ही बातमीही अनेकदा चर्चेत राहते. त्याचं ‘माही रेसिडेन्सी’ नावाचं हॉटेल रांचीमध्ये लोकप्रिय आहे.