म्युच्युअल फंड, FD की सोने…10 वर्षांत 1 कोटींचा फंड कशातून तयार होईल?; संपूर्ण हिशोब इथे समजून घ्या!

Published on -

अवघ्या 10 वर्षांत करोडपती होणं… ऐकूनच छान वाटतं, नाही का? पण हे फक्त स्वप्न न राहता प्रत्यक्षात उतरवायचं असेल, तर गरज असते शहाणपणाने आणि सातत्याने गुंतवणूक करण्याची. सध्या FD, म्युच्युअल फंड आणि सोनं हे तीन सर्वात चर्चेतील पर्याय आहेत, पण यातून नक्की काय निवडावं, हा प्रश्न अनेकांना सतावतो. या लेखात आपण या तिन्ही पर्यायांबद्दल सविस्तर तुलना पाहणार आहोत.

म्युच्युअल फंड

सुरुवात म्युच्युअल फंडांपासून करूया. जर तुम्ही दरमहा 43,500 रुपये म्युच्युअल फंडाच्या SIP स्वरूपात गुंतवले, आणि दरवर्षी सरासरी 12% परतावा मिळत गेला, तर 10 वर्षांनंतर तुमच्या खात्यात सुमारे 1.01 कोटी रुपये जमा होऊ शकतात. यातून तुमची मूळ गुंतवणूक सुमारे 52.2 लाख रुपये असेल आणि उरलेली रक्कम म्हणजेच 48.8 लाख रुपये चक्रवाढ परताव्यामुळे वाढलेली असेल. अर्थात, हा एक अंदाज आहे आणि शेअर बाजाराच्या चढ-उतारांवर हे अवलंबून असतं. म्हणूनच ज्यांना एकाचवेळी एवढी रक्कम SIP मध्ये घालणं कठीण वाटतं, त्यांच्यासाठी Step-up SIP हा चांगला पर्याय असतो. यात तुम्ही कमी रकमेपासून सुरुवात करून दरवर्षी थोडी थोडी वाढ करू शकता.

FD म्हणजे काय?

पण जर तुम्हाला अधिक स्थिर आणि निश्चित परतावा हवा असेल, तर FD म्हणजेच मुदत ठेव एक शांततेचा पर्याय ठरू शकतो. समजा तुमच्याकडे एकरकमी 50 लाख रुपये आहेत, आणि तुम्ही ते 10 वर्षांसाठी 7% वार्षिक व्याजदराने गुंतवले, तर व्याजासह तुम्हाला 1 कोटी रुपयांचा फंड मिळू शकतो. मात्र लक्षात ठेवा, FD मधून मिळणारा परतावा बाजाराच्या तुलनेत कमी असतो आणि तो दरवर्षी बदलूही शकतो. तसेच, महागाई दर विचारात घेतल्यास FD चा खरा परतावा कधी कधी फारसा फायद्याचा राहत नाही.

सोन्यामधील गुंतवणूक

आता येऊ सोन्याकडे. पारंपरिक गुंतवणुकीसाठी अनेक लोकांचा विश्वास सोन्यावर असतो. काही कारणांनी तो योग्यही आहे. सोनं म्हणजे स्थिर मालमत्ता, आणि संकटकाळात त्याचा उपयोग होतोच. पण सोन्याच्या किमती अनेक वेळा चढ-उतार करतात. म्हणजे, तुम्ही 10 वर्षं नियमित सोनं विकत घेतलं, तरी त्यातून 1 कोटींचा फंड तयार होईलच, याची हमी नाही. शिवाय सोनं उत्पन्न देत नाही, ना त्यावर व्याज, ना लाभांश. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक ही एक सुरक्षितता देणारी मालमत्ता मानली जाते, परतावा देणारी नाही.

तुमच्यासाठी कोणता पर्याय योग्य?

जर तुमचं ध्येय आहे “कमी जोखीम आणि ठराविक परतावा”, तर FD कदाचित तुमच्यासाठी योग्य ठरेल. पण जर तुमचा उद्देश जास्त परताव्याचा आहे आणि तुमचं धाडस बाजाराच्या चढ-उतारांना झेलण्याचं आहे, तर म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय ठरू शकतो. आणि हो, सोनं ते तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओला संतुलन देण्यासाठी एक पूरक पर्याय ठरू शकतो, पण केवळ सोन्यावरच भर न देता त्याचा समतोल वापर करावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!