ना अरिजीत, ना जुबिन…’Saiyara’ गाण्याने तरुणाईला वेड लावणारा हा नवा काश्मिरी गायक कोण?, यूट्यूबवर होतोय ट्रेंड!

Published on -

बॉलिवूडमधील एक नवीन सूर सध्या प्रत्येकाच्या ओठांवर आहे. ‘सैयारा’ हे गाणं, ज्याने तरुणांच्या मनावर प्रचंड छाप सोडली आहे. प्रेमाच्या हळुवार भावना आणि सॉफ्ट म्युझिकची जादू अशी काही पसरली आहे की या गाण्याने रातोरात लाखो चाहत्यांची मनं जिंकली. पण या गाण्याचा आवाज कोणाचा आहे, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारण हे गाणं ना अरिजीतने गायलेलं आहे, ना अरमान मलिकने, ना जुबिन नौटियालने. तर मग हा जादूई आवाज कोणाचा? तो आहे ‘काश्मीरचा सितारा’ फहीम अब्दुल्ला!

कोण आहे फहीम अब्दुल्ला?

‘सैयारा’ हा मोहित सुरी दिग्दर्शित एक संगीतप्रधान प्रेमकथानक असलेला चित्रपट आहे, ज्यामध्ये नवोदित कलाकार अहान पांडे आणि अनिता पद्डा यांची फ्रेश केमिस्ट्री पहायला मिळते. पण चित्रपटातील शीर्षकगीताने, ‘सैयारा तू तो बदला नहीं है’, प्रेक्षकांच्या काळजात घर केलंय. हेच गाणे गाणारा फहीम अब्दुल्ला हा केवळ गायक नाही, तर काश्मीरमधून आलेला एक बहुगुणी कलाकार आहे.

वय फक्त 27, पण त्याच्या आवाजात एक परिपक्व शांतता आणि एक जादू आहे, जी थेट मनाला भिडते. एकेकाळी ‘द इमॅजिनरी पोएट’ या नावाने ओळखला जाणारा फहीम आता बॉलिवूडमध्ये आपल्या खऱ्या ओळखीने पाऊल ठेवतो आहे. त्याचे पहिले गाणं असलं तरी त्याचा आत्मविश्वास, त्याची प्रतिभा आणि त्या गाण्यातली भावना पाहता तो बराच पुढे जाईल, हे नक्की.

कोण आहे अर्सलान निजामी?

या यशामागे अजून एक महत्त्वाचा चेहरा आहे, अर्सलान निजामी. तो एकेकाळी सिव्हिल इंजिनीअर होता. लेहजवळ एका बांधकाम कंपनीत नोकरी करत होता. पण मन मात्र संगीतातच रमत होतं. शेवटी पंखांना आकाश द्यावं असं वाटून त्याने नोकरी सोडली आणि आपल्या संगीताची वाट निवडली. फहीमसोबत त्याने काश्मीरमध्ये आधीच नाव कमावलं होतं, पण आता बॉलिवूडमध्ये तनिष्क बागचीसोबत त्याने ‘सैयारा’चं शीर्षकगीत तयार करून एक नवा टप्पा गाठला.

गाण्याचे बोल कुणी लिहिले?

या गाण्याचे बोल लिहिले आहेत इर्शाद कामिल यांनी, जे आधीच आपल्या हृदयस्पर्शी लेखनासाठी प्रसिद्ध आहेत. पण जेव्हा या बोलांना फहीमचा मखमली आवाज आणि अर्सलानचं संगीत लाभलं, तेव्हा ‘सैयारा’ एक सरस आणि गहिरे गीत बनलं. गाणं रिलीज होताच यूट्यूबवर अवघ्या काही दिवसांत 100 दशलक्षहून अधिक व्ह्यूज मिळाले आणि ते ट्रेंडिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचलं.

फहीमने आधीही ‘इश्क’, ‘झेलम’, ‘गल्लान’, ‘सजदे’ अशा काश्मिरी गाण्यांमधून आपली छाप पाडली आहे. त्याची ‘इश्क’ ही क्लासिक रोमँटिक ट्रॅक 252 दशलक्ष व्ह्यूजसह सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. पण ‘सैयारा’ने त्याला राष्ट्रीय पातळीवर पोहोचवलं.

देशभरात प्रसिद्ध झाले हे काश्मिरी कलाकार

या प्रवासातला सगळ्यात रोमांचक भाग म्हणजे, फहीम आणि अर्सलान मुंबईला केवळ 14 दिवसांचा खर्च घेऊन आले होते. अगदी स्वप्नांइतकाच विश्वास घेऊन! पण 13 व्या दिवशीच ते तनिष्क बागची यांना भेटले, आणि त्यांची कला पाहताच तनिष्कने त्यांना एक संधी दिली. ती एक संधी होती जी त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेली.

‘सैयारा’मुळे फहीम अब्दुल्ला नाव आता केवळ काश्मीरमध्ये नाही, तर संपूर्ण देशात ओळखलं जातंय. त्याचा आवाज, त्याची कहाणी आणि त्याचं स्वप्न प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारं ठरत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!