युरोपच्या सुंदर पर्वतरांगांमध्ये, एका छोट्याशा देशाने जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे, त्याचं नाव आहे लिक्टेंस्टाइन. हा देश दिसायला जरी लहान असला, तरी त्याचं वैशिष्ट्य आणि जीवनशैली खूप मोठी आहे. ना स्वतःचं सैन्य, ना चलन, ना विमानतळ तरीही हा देश जगातील श्रीमंत आणि सुरक्षित देशांच्या यादीत अव्वल स्थान मिळवतो. हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण लिक्टेंस्टाइनचं हे अनोखं अस्तित्व हीच त्याची खरी ताकद आहे.

लिक्टेंस्टाइन देश
स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रियासारख्या बलाढ्य देशांच्या मध्ये वसलेला लिक्टेंस्टाइन, निसर्गसौंदर्य आणि शांततेसाठी प्रसिद्ध आहे. येथे सुमारे 30,000 लोक राहतात. म्हणजेच एक मध्यमवर्गीय शहरासारखीच लोकसंख्या. पण या मोजक्या नागरिकांचं जीवन इतकं सुरक्षित आणि सुखद आहे की, हा देश जगातील ‘सर्वात सुरक्षित देश’ मानला जातो. या दाव्याला बळकटी देणारी एक खास गोष्ट म्हणजे, संपूर्ण देशात केवळ 7 कैदी तुरुंगात आहेत.
एवढ्या सुरक्षिततेचं गमक काय, असा प्रश्न पडतो. तर लिक्टेंस्टाइनमध्ये गुन्हेगारी जवळजवळ शून्यावर आहे. इथले नागरिक अत्यंत सुशिक्षित, सुखवस्तू आणि समाधानी आहेत. देशाची प्रशासन यंत्रणा लवचिक आणि लोकाभिमुख आहे. स्विस फ्रँक हेच इथलं अधिकृत चलन असून, लिक्टेंस्टाइनचं स्वतःचं चलन नाही. तसंच, येथे जर्मन भाषा बोलली जाते, कारण देशाची स्वतःची वेगळी भाषा देखील नाही.
सैन्य नाही, स्वतःची भाषा नाही आणि विमातळही नाही
या देशाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे सैन्यसुद्धा नाही. होय, या देशात युद्धासाठी किंवा संरक्षणासाठी स्वतंत्र लष्कर नाही. स्वित्झर्लंडच्या सहकार्याने देशाचं संरक्षण केलं जातं. इतकंच नव्हे तर देशात करप्रणालीही अत्यंत माफक आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्यांना फार कमी कर भरावा लागतो, आणि परिणामी त्यांच्या हातात अधिक पैसा शिल्लक राहतो.
विमानतळाचीही गरज लिक्टेंस्टाइनला भासत नाही. येथे कोणताही आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही. प्रवाशांना स्वित्झर्लंडमधील विमानतळ वापरून मग लिक्टेंस्टाइनमध्ये यावं लागतं. हे ऐकून एखाद्याला वाटेल की, या देशाची सुविधा मर्यादित असतील. पण प्रत्यक्षात, लिक्टेंस्टाइन एक आदर्श प्रशासनाचा, पर्यावरणप्रिय जीवनशैलीचा आणि आर्थिक शिस्तीचा उत्तम नमुना आहे.