जगातील सर्वात पावसाळी ठिकाणाबद्दल विचार करताना बरेच लोक चेरापुंजीचं नाव घेतात. मात्र खरे वास्तव काही वेगळेच आहे. या गैरसमजाचा उलगडा करतो मावसिनराम..मेघालयाच्या खासी पर्वतरांगांमध्ये वसलेलं एक छोटंसं पण विलक्षण गाव. हे गाव चेरापुंजीच्या अगदी शेजारी असूनदेखील, पावसाच्या बाबतीत त्याच्याही पुढे गेले आहे.

मावसिनराम गाव
मावसिनराममध्ये वर्षभरात तब्बल 11,871 मिमी पाऊस पडतो. ही संख्या इतकी मोठी आहे की, 2000 नंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने देखील ‘जगातील सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण’ म्हणून मावसिनरामचं नाव नोंदवलं आहे. हे गाव समुद्रसपाटीपासून सुमारे 1,491 मीटर उंचीवर असून, बंगालच्या उपसागराच्या अत्यंत जवळ असल्याने इथं भरपूर ओलसर वारे येतात. हे वारे खासी टेकड्यांवर आदळतात, ढग तयार करतात आणि अखंड मुसळधार पाऊस सुरू होतो विशेषतः जुलै महिन्यात, जेव्हा पावसाचा जोर सर्वाधिक असतो.
इथल्या पावसामुळे जीवनशैली अगदी वेगळी बनली आहे. स्थानिक लोकांमध्ये बांबूपासून तयार केलेल्या ‘कानुप’ नावाच्या छत्र्यांचा वापर फार प्रचलित आहे. ही छत्री डोकं आणि खांदे पूर्ण झाकते. रस्ते सतत खराब होत असल्याने दळणवळण कठीण होते, आणि शेतीसुद्धा आव्हानात्मक बनते. पण तरीही मावसिनराममधील सुपीक जमिनीतून चहा आणि संत्र्यांची लागवड केली जाते. पावसामुळे वस्तू वाळवण्यासाठी विशेष ड्रायर वापरले जातात आणि लोक सर्व सामान प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवतात.
पर्यटन आणि संकृती
हे गाव केवळ पावसासाठीच प्रसिद्ध नाही, तर निसर्गाच्या सौंदर्यासाठीही तितकंच महत्त्वाचं आहे. ढगांच्या कुशीत हरवलेली ही खोरं, हिरवीगार टेकड्या, अनेक लहान-मोठे धबधबे आणि गुहा यामुळे पर्यटकांसाठी हे एक स्वप्नवत ठिकाण आहे. लिव्हिंग रूट ब्रिज्स (जिवंत मुळांपासून तयार झालेले पूल) हे येथील अनोखे आकर्षण आहेत.
मात्र, इतक्या पावसात सार्वजनिक सुविधा जसे की रुग्णालय, शाळा, आणि रस्ते बांधणे फार कठीण ठरतं. तरीही खासी जमातीतले लोक पावसाला शाप न मानता त्याला एक आशीर्वाद मानतात. ढगांचे स्वागत लोकनृत्य आणि गाण्यांनी केले जाते. त्यांच्या नजरेत पाऊस म्हणजे निसर्गाशी नातं, जे रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलं आहे.