सोनं-चांदी नव्हे तर आगामी काळात ‘ही’ गोष्ट बनणार सर्वात मौल्यवान; धक्कादायक वास्तव समोर!

भविष्यात सर्वात मौल्यवान काय असेल, असा प्रश्न विचारला तर अनेकांच्या डोळ्यासमोर सोने, चांदी किंवा जमीन-मालमत्तेचा विचार येईल. पण आजच्या घडीला या पारंपरिक गोष्टींचा जमाना हळूहळू मागे पडत चालला आहे. कारण, आर्थिक जगतामध्ये सध्या एका वेगळ्याच क्रांतीचा बोलबाला आहे जी ‘ऊर्जा’ आणि ‘इलेक्ट्रॉन’ यांच्या महत्त्वावर आधारलेली आहे.

झेरोधा या प्रसिद्ध स्टॉक ब्रोकिंग कंपनीचे सह-संस्थापक निखिल कामत यांनी केलेलं वक्तव्य याच दिशेने इशारा करतं. ज्यामध्ये ते म्हणतात की, पुढील 5 ते 10 वर्षांत सोनं-चांदी नाही, तर ऊर्जा हेच खरं संपत्तीचं रूप ठरणार आहे.

सध्या सोन्याच्या किंमती गगनाला भिडत आहेत. त्यामुळे अनेकांना वाटतं की भविष्यात यापेक्षा जास्त सुरक्षित गुंतवणूक काही असू शकत नाही. मात्र, निखिल कामत यांचा विश्वास आहे की ही पारंपरिक संकल्पना आता कालबाह्य होणार आहे. त्यांच्या मते, इलेक्ट्रॉन आणि ऊर्जा या दोन गोष्टी भविष्यातील महत्त्वाच्या मालमत्ता ठरणार आहेत. उद्याच्या जगात ‘ऊर्जा’ हीच नवी चलन व्यवस्था ठरू शकते, असंही ते म्हणतात.

त्यांच्या या विधानामागे एक स्पष्ट कारण आहे आणि ते म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डेटा सेंटर्सचा झपाट्याने वाढणारा वापर. आज आपलं जग डिजिटल होत चाललं आहे. प्रत्येक सेकंदाला कोट्यवधी डेटा तयार होतो आणि तो साठवण्यासाठी व प्रक्रिया करण्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते.

AI च्या वापरामुळे ही मागणी अजूनच वाढत चालली आहे. याचं एक थक्क करणारं उदाहरण म्हणजे एका मोठ्या डेटा सेंटरचा वार्षिक वीज वापर, जवळपास 4 लाख इलेक्ट्रिक गाड्यांच्या वापराइतकाच असतोआणि या केंद्रांचा एकूण खर्चात 65% वाटा फक्त वीजेचा असतो.

जगभरात सध्या सर्वाधिक डेटा सेंटर्स अमेरिकेत आहेत. जवळपास 3,680. भारत या शर्यतीत सातव्या क्रमांकावर असून येथे 262 डेटा सेंटर्स आहेत. तज्ज्ञांचा अंदाज आहे की 2030 पर्यंत ही डेटा सेंटर्स जगातील एकूण वीज वापराच्या 10% इतकी उर्जा वापरणार आहेत.

म्हणजेच, ऊर्जा ही केवळ उद्योगाची गरज राहणार नाही, तर ती आर्थिक व्यवस्थेचा केंद्रबिंदू ठरेल. इतकंच नाही, जर इंटरनेटवरील केवळ 5% सर्च AI च्या मदतीने केले गेले, तरी त्यासाठी लागणारी ऊर्जा तब्बल 10 लाख भारतीय घरांना वर्षभर पुरेल इतकी असते. त्यामुळेच ऊर्जा आणि डेटा यांची गुंतवणूक ही पुढील काळात सोन्या-चांदीपेक्षा अधिक मोलाची ठरणार आहे, असे म्हटले जात आहे.