पाकिस्तान म्हटले की आपल्या मनात लगेच राजकारण, सीमावाद आणि धर्मविघटनाची जाणीव होते. पण या देशाच्या हृदयात एक अशी जागा आहे, जिथे श्रद्धेच्या अश्रूंनी एक पवित्र इतिहास घडवला आहे. चकवाल गावाजवळील कटासराज मंदिर ही अशीच एक जागा आहे, जी नुसती ऐकली तरी मन थबकून जातं. हजारो वर्षांपासून श्रद्धेचं प्रतीक बनलेलं हे शिवमंदिर केवळ धार्मिक नसून, मानवी भावना आणि पुरातन इतिहासाची जिवंत आठवण आहे.

कटासराज मंदिर
चकवाल जिल्ह्यातल्या टेकड्यांमध्ये वसलेलं हे मंदिर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आहे. हे मंदिर पाहताना क्षणभर वाटतं की इथे काळच थांबलेला आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेली ही जागा इतकी शांत आणि भव्य आहे की कोणतीही धार्मिक भावना नसली, तरी मन नकळत नतमस्तक होतं. या मंदिराची विशेषता म्हणजे येथे असलेला पवित्र तलाव, जो केवळ तलाव नसून, श्रद्धेचा साक्षात्कार आहे.
पौराणिक कथेनुसार, जेव्हा सतीने यज्ञकुंडात स्वतःला होम केलं, तेव्हा शंकर भगवानांनी वेदनेने ढसाढसा रडायला सुरुवात केली. त्यांचे अश्रू पृथ्वीवर कोसळले, आणि त्यातलाच एक अश्रू चकवालच्या या स्थळी पडला, ज्यामुळे इथे कटासराजचा तलाव निर्माण झाला. या जलाशयाचा प्रत्येक थेंब एक दिव्य अनुभूती देतो, असं स्थानिक भाविकांचं म्हणणं आहे.
महाभारत काळातील पौराणिक कथा
इतकंच नाही, तर या मंदिराला महाभारत काळाशीही जोडलं जातं. सांगितलं जातं की पांडवांनी त्यांच्या 14 वर्षांच्या वनवासातील काही काळ इथे घालवला होता. त्यांनी सात वेगवेगळी मंदिरे इथे उभारली होती. आज जरी त्यांची काही वास्तू केवळ अवशेष स्वरूपात उरली असली, तरी इतिहासाच्या पावलांची ती साक्ष देत राहते.
पूर्वी भारत-पाकिस्तान फाळणी होण्याआधी येथे हजारो हिंदू भाविक आपल्या पूर्वजांना तर्पण अर्पण करत असत. तलावात स्नान करून पापमोचन करत असत. आजही, कटासराज मंदिर हे सीमारेषा ओलांडूनही हजारो हिंदू आणि शैव भक्तांच्या श्रद्धेचं केंद्रबिंदू आहे. इथं येणाऱ्या प्रत्येकाचं मन या शांततेनं आणि देवत्वाने भारून जातं.