स्वयंपाकघरातील मसाल्यांमध्ये अनेक वेळा असे घटक लपलेले असतात, जे चव वाढवण्यापेक्षा आरोग्यासाठी अधिक उपयोगी ठरतात. याचपैकी एक म्हणजे काळी वेलची. साधी दिसणारी, पण गुणांनी भरलेली ही वेलची आपल्या आरोग्याच्या अनेक तक्रारींवर रामबाण उपाय ठरू शकते. आयुर्वेदात याचा उल्लेख केवळ एक मसाला म्हणून नाही, तर विविध रोगांवरील प्रभावी औषध म्हणून केला गेला आहे.

काळी वेलची ही झिंगिबेरेसी कुटुंबातील आहे आणि मुख्यतः भारताच्या व नेपाळच्या हिमालयीन भागांत आढळते. तिच्या जाडसर शेंगा आणि त्यामधील चिकट, बारीक काळ्या बिया, हे आरोग्यदायी औषधी गुणांनी भरलेले आहेत. आयुर्वेदामध्ये काळी वेलचीला खूप मान आहे. चरक संहितेत ती वेदना, दुर्गंधी, त्वचारोग, मळमळ आणि पाचन तक्रारी यांवर वापरण्यात येते. विशेष म्हणजे ती ‘अंगमर्द प्रशमन’ म्हणजे शरीरातील वेदना दूर करणाऱ्या औषधांच्या यादीतही आहे.
काळी वेलचीचे फायदे
तुम्ही पोटाशी संबंधित त्रासाने त्रस्त असाल तर काळी वेलची तुमच्यासाठी वरदान आहे. आयुर्वेदानुसार, तिच्या ‘दीपन’ आणि ‘पाचन’ गुणांमुळे ती अपचन, गॅस, पोटदुखी, बद्धकोष्ठता यांसारख्या तक्रारींवर प्रभावी उपाय ठरते. उन्हाळ्यात काळी वेलची उकळून त्याचे पाणी प्यायल्याने फक्त पचनच नव्हे, तर रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
आजच्या बदलत्या हवामानात, सर्दी-खोकला, विषाणूजन्य ताप यांसारखे हंगामी आजार वाढले आहेत. पण काळी वेलची ‘ओज वर्धक’ असल्यामुळे तुमचं शरीर अशा संक्रमणांपासून सुरक्षित ठेवते. ती शरीरातून विषारी घटक बाहेर काढते, मूत्रपिंडांची कार्यक्षमता सुधारते, आणि परिणामी त्वचा व केस निरोगी राहतात.
तोंडाची दुर्गंधी, हिरड्यांची सूज किंवा इन्फेक्शनसाठीही ती एक नैसर्गिक उपाय आहे. तिच्यात असलेले अँटीमायक्रोबियल गुण तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करतात. तिचा तिखट वास आणि उष्ण गुणधर्म सर्दी, खोकला व घशाच्या त्रासावरही उपयोगी ठरतो.