विराट कोहली आणि रोहित शर्मा ही दोन नावं फक्त भारतीय क्रिकेटप्रेमींच्याच नव्हे तर संपूर्ण जगभरातल्या चाहत्यांच्या मनात घर करून बसलेली आहेत. आज दोघांनीही कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी वनडे सामन्यांमध्ये त्यांच्यातील लढतीकडे अजूनही लाखो डोळे लागून असतात. पण या दोन दिग्गजांमध्ये आकड्यांच्या भाषेत खरं कोण भारी आहे? हा प्रश्न नेहमी चर्चेचा विषय ठरतो.
विराट कोहलीचे रेकॉर्ड

विराट कोहलीच्या कारकिर्दीकडे पाहिलं, तर त्याच्या बॅटमधून गेल्या कित्येक वर्षांपासून धावांचा धबधबा वाहतो आहे. आतापर्यंत त्याने 302 एकदिवसीय सामन्यांमध्ये 14,181 धावा केल्या आहेत आणि त्याची सरासरी 57.88 इतकी प्रभावी आहे. 51 शतके आणि 74 अर्धशतकं ही त्याची सांख्यिक उपलब्धी केवळ आकड्यांची नव्हे, तर मेहनतीची, सातत्याची आणि संघासाठी झगडण्याची जिवंत साक्ष आहे. त्याने 183 धावांची सर्वोत्तम खेळी केली होती, जी आजही क्रिकेट चाहत्यांच्या आठवणीत जशीच्या तशी कोरली गेली आहे.
रोहित शर्माचे रेकॉर्ड
दुसरीकडे, रोहित शर्मा म्हणजे शांत स्वभावाचा, पण जेव्हा सूर लागतो तेव्हा गोलंदाजांची झोप उडवणारा फलंदाज. त्याने 273 एकदिवसीय सामन्यांतून 11,168 धावा केल्या असून त्याची सरासरी 48.77 आहे. त्याची 264 धावांची ऐतिहासिक खेळी आजही वनडे इतिहासातील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या म्हणून उभी आहे. रोहितची 32 शतके आणि 58 अर्धशतके त्याच्या स्टाईलमध्ये आक्रमकतेचा आणि संयमाचा सुंदर मिलाफ दाखवतात.
जर वनडे सामन्यांबद्दल तुलना केली, तर येथे विराट कोहली स्पष्टपणे आघाडीवर आहे. त्याच्या नावावर रोहितपेक्षा जवळपास 3,000 अधिक धावा आहेत आणि त्यानं 19 शतके जास्त झळकावली आहेत. हे आकडे केवळ संख्या नाहीत, तर कोहलीच्या अविरत प्रयत्नांची आणि त्याच्या ‘रन मशीन’ असण्याच्या ओळखीची साक्ष आहेत.
कसोटी क्रिकेट
कसोटी क्रिकेटमध्येही विराटने आपली ‘विराट’ छाप पाडली आहे. 123 कसोटीत 9,230 धावा आणि सरासरी 46.85 ही त्याची साक्ष आहे. 30 शतके आणि 31 अर्धशतके यामुळे कोहलीने कसोटीतही ‘किंग’ ही पदवी सार्थ ठरवली आहे.
या तुलनेत रोहित शर्माने कसोटीत 67 सामन्यांतून 4,301 धावा केल्या असून त्याची सरासरी 40.58 आहे. 12 शतके आणि 18 अर्धशतकांनी त्यानेही अनेकदा संघाला भक्कम सुरुवात करून दिली, पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा प्रवास थोडा उशिरा सुरू झाला हेही लक्षात घ्यावं लागतं.
एकत्रित पाहिलं, तर विराट कोहलीने एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमधून मिळून 23,411 धावा केल्या आहेत, तर रोहित शर्माच्या नावावर 15,469 धावा आहेत. म्हणजेच कोहली रोहितपेक्षा जवळपास 8,000 धावांनी पुढे आहे.