आपण ज्या देशात जन्मलो, तो केवळ ‘इंडिया’ किंवा ‘भारत’ या दोनच नावांनी ओळखला जात नाही, तर त्याच्या नावांचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. विविध संस्कृती, धर्म, परदेशी सम्राट, लेखक आणि संत-महंत यांच्या उल्लेखांमधून भारताची एकूण 12 नावे उदयास आली आहेत. ही नावे केवळ उच्चारासाठी नाहीत, तर ती त्या त्या काळातील भारताच्या ओळखीचा, संस्कृतीचा आणि संपत्तीचा ठसा आहेत.
भारत आणि इंडिया
सर्वात लोकप्रिय आणि आपल्याला रोज ऐकायला मिळणारं नाव म्हणजे भारत. हे नाव महाभारतातील पराक्रमी राजा भरत याच्या नावावरून पडलं आहे. याच्या पुढे इंडिया हे नाव ब्रिटिश साम्राज्यकाळात जगात प्रचलित झालं. ‘इंडस’ अर्थात सिंधू नदीवरून ‘India’ हे नाव आलं.
हिंदुस्थान आणि आर्यावर्त
तिसरं नाव हिंदुस्थान. हे विशेषतः मध्ययुगीन मुस्लिम राजवटीच्या काळात वापरलं गेलं, ज्याचा अर्थ “हिंदूंची भूमी” असा होतो. पुढे आपण वाचतो आर्यावर्त, आर्यांच्या वास्तव्यामुळे उत्तरेकडील भागाला हे नाव देण्यात आलं होतं.
जंबुद्वीप आणि भारतवर्ष
पुराणात उल्लेख असलेलं जंबुद्वीप हेही नाव आहे. यामध्ये भारताचा समावेश असल्याचं मानलं जातं. तर भारतवर्ष हे नाव संपूर्ण उपखंडासाठी वापरलं जात होतं, आणि हेही महाभारत व इतर पुराणात आढळतं.
इतर नावे
इतक्यावरच नाही. अरबी भाषेत भारताला अल-हिंद म्हणतात, तर हिब्रू भाषेत होडू नावाने ओळखतात. चीनमध्ये भारताला तियानझू, तिबेटमध्ये ग्यागर, आणि काही प्राचीन वर्णनांमध्ये फाग्युल या नावानेही ओळखले जाते.
प्रत्येक नावाला एक कथा, एक इतिहास आहे. या नावांतून भारताचा केवळ भूगोल नाही, तर त्याचा सांस्कृतिक वारसा, अध्यात्म, शक्ती आणि वैश्विक महत्त्वही दिसून येतं.