फक्त पर्यटन नाही, थायलंड ‘या’ 7 क्षेत्रांतूनही करतो अब्जावधींची कमाई! भारतालाही टाकलं मागे

Published on -

थायलंड म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर सुंदर समुद्रकिनारे, झगमगती मंदिरे आणि चकचकीत रस्त्यांवर फिरणाऱ्या पर्यटकांची गर्दी उभी राहते. पण या चमकधमक मागे एक भक्कम आणि विविध अंगांनी गुंफलेली अर्थव्यवस्था आहे, जी केवळ पर्यटनावर अवलंबून नाही. आज जरी थायलंड आणि कंबोडियामध्ये राजकीय तणावाचं वातावरण असेल, तरी या पार्श्वभूमीवर थायलंडचं आर्थिक स्वरूप समजून घेणं अधिक महत्त्वाचं ठरतं.

थायलंडची अर्थव्यवस्था

थायलंडची अर्थव्यवस्था पाहिली, तर ती केवळ एका आधारावर उभी नाही. खरंतर, हा देश अनेक आर्थिक स्तंभांवर तोलून धरलेला आहे. त्यापैकी एक महत्त्वाचा भाग म्हणजे शेती आणि विशेषतः भातशेती. थायलंड हा जगातील आघाडीचा तांदूळ निर्यात करणारा देश मानला जातो. येथील सुवासिक ‘जास्मिन राईस’ची चव जगभर प्रसिद्ध आहे. ही शेती केवळ आंतरराष्ट्रीय व्यापाराचं साधन नाही, तर देशातील लाखो ग्रामीण कुटुंबांचं आर्थिक बळ देखील आहे.

शेतीनंतर जर एखाद्या क्षेत्राने थायलंडला जागतिक स्तरावर वेगळं स्थान मिळवून दिलं असेल, तर ते म्हणजे सागरी उत्पादन. मासे, कोळंबी, खेकडे, स्क्विड यांसारख्या समुद्री पदार्थांची निर्यात थायलंडसाठी अब्जावधी डॉलर्सची उलाढाल घडवते. हा व्यवसाय केवळ कमाईचं साधन नाही, तर लाखो लोकांच्या हाताला काम देणारा मजबूत आधार आहे.

औद्योगिक क्षेत्रातही थायलंड मागे नाही. इलेक्ट्रॉनिक्सपासून ते ऑटोमोबाईल्स, कापड, रसायनं आणि हार्डवेअरपर्यंत अनेक उत्पादनं जगभर निर्यात होतात. हे उत्पादनक्षेत्र देशाच्या GDP मध्ये मोठं योगदान देतं. विशेष म्हणजे थायलंडच्या एकूण उत्पन्नापैकी जवळपास 60 टक्के उत्पन्न निर्यातीवर आधारित आहे.

वैद्यकीय पर्यटन

थायलंडची आणखी एक उल्लेखनीय ओळख म्हणजे वैद्यकीय पर्यटन. परवडणाऱ्या आणि दर्जेदार आरोग्यसेवेमुळे जगभरातून रुग्ण थायलंडमध्ये उपचारासाठी येतात. दातांच्या उपचारांपासून ते प्लास्टिक सर्जरी, हृदयविकाराच्या शस्त्रक्रियांपर्यंत अनेक सेवा येथे मोठ्या प्रमाणावर घेतल्या जातात. यामुळे केवळ रुग्णच नव्हे, तर देशही आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होतो.

पारंपरिक हस्तकला

याशिवाय, थायलंडच्या पारंपरिक हस्तकलेची मागणीही आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात आहे. रेशीम, लाकूडकाम, मातीकाम आणि पारंपरिक दागिने यांना जगभरातून मागणी असते. ही कला देशाच्या सांस्कृतिक ओळखीचं प्रतीक असली, तरी तिचं आर्थिक महत्त्व कमी नाही.

हे सगळं असूनही, थायलंडच्या अर्थव्यवस्थेतील पर्यटनाचं स्थान अजूनही महत्त्वाचं आहे. बँकॉकच्या गगनचुंबी इमारती, फुकेतचे निळसर किनारे, पटायातील रंगीबेरंगी रात्रजीवन आणि बौद्ध धर्मस्थळांची शांती या सगळ्यामुळे जगभरातून कोट्यवधी पर्यटक दरवर्षी थायलंडकडे वळतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!