श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सणाला खास महत्त्व असतं, पण नाग पंचमी म्हणजे त्यातली एक अनोखी श्रद्धेची जिवंत अनुभूती. आपल्या पुराणकथांमध्ये आणि धार्मिक परंपरेत सर्पदेवतेला एक विशेष स्थान आहे. नाग पंचमीचा दिवस म्हणजे केवळ सापांची पूजा नव्हे, तर ती एक संधी असते. आपल्या कुंडलीतील दाहक दोष दूर करण्याची, भयमुक्त झोप घेण्याची आणि आयुष्यात शांततेचा श्वास घेण्याची.

यंदा नाग पंचमी 29 जुलै 2025 रोजी साजरी होणार आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला हा सण देशभरात मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. या दिवशी भगवान शिवासोबत सर्प देवतेचीही पूजा केली जाते. शिवाच्या गळ्यात वसणारा सर्प हा त्यांच्या सौम्य आणि उग्र दोन्ही रूपांचा प्रतीक मानला जातो. त्यामुळेच नाग पंचमीचा दिवस म्हणजे शांती, आराधना आणि आंतरिक शुद्धतेचं प्रतीक मानला जातो.
‘कालसर्प दोष’वरील उपाय
ज्योतिषशास्त्रानुसार, अनेक लोकांच्या कुंडलीत ‘कालसर्प दोष’ असतो. एक अस्वस्थ करणारा योग जो वारंवार वाईट स्वप्न, सापांचे भयानक दर्शन आणि जीवनातील स्थैर्य हरवण्यास कारणीभूत ठरतो. अशा लोकांना झोपेतून घाबरत जाग येणं, प्रगतीमध्ये अडथळे येणं, आर्थिक अडचणी जाणवणं ही लक्षणं सतत जाणवत राहतात. या दोषामुळे मनात अनामिक भीती आणि नकारात्मक ऊर्जा दाटून बसते.
नाग पंचमीचा दिवस या दोषापासून मुक्त होण्यासाठी फारच उपयुक्त मानला जातो. या दिवशी विधीपूर्वक भगवान शंकराची पूजा करून शिवलिंगावर काळे तीळ आणि गंगाजल अर्पण केल्यास त्या दोषाचे प्रभाव कमी होतात, असं मानलं जातं. शिवाच्या आराधनेसोबतच महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने मनाला स्थैर्य, शांती आणि आरोग्य लाभते.
नाग-नागिनची चांदीची जोडी
कालसर्प दोष पूर्णपणे दूर करण्यासाठी एक खास परंपरा सांगितली जाते. चांदी किंवा तांब्यापासून बनवलेली नाग-नागिनची एक जोडी घ्यावी आणि ती पवित्र नदीत विसर्जित करावी. ही कृती केवळ दोष शांतीसाठी नाही, तर आपल्यातील श्रद्धा, समर्पण आणि शुद्ध मनोभाव व्यक्त करण्यासाठीसुद्धा आहे.
या दिवशी एक भावनिक परंपरा अजूनही गावाकडे जपली जाते.घराच्या मुख्य दरवाज्यावर गेरू, शेण आणि माती वापरून सापाचं चित्र काढलं जातं आणि त्याची पूजा केली जाते. हा एक सुंदर आणि अर्थपूर्ण सांस्कृतिक संकेत आहे. सर्प हे संकटांचं रूप नसून, संरक्षण आणि संतुलनाचं प्रतीक आहे, हे मनाशी रुजवण्याचा.