आठवड्याचे फक्त 4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी! ‘या’ देशांनी बदलले नोकरीचे नियम, वर्क-लाईफ बॅलन्सचा फॉर्म्युला जगभर चर्चेत

Published on -

आठवड्याचे शेवटचे दिवस कुठलाही ताण नाही, ऑफिसचे ईमेल नाहीत आणि फक्त निवांत विश्रांती.. हे स्वप्न प्रत्येक कामगाराचे असते. भारतासारख्या देशात तर ही कल्पना एक स्वप्नच वाटते. मात्र, काही देशांमध्ये ही कल्पना सत्यात उतरत आहे. जगभरातील अनेक सरकारे आणि कंपन्या एक नवा प्रयोग करत आहेत. आठवड्यातून फक्त 4 दिवस काम आणि 3 दिवस विश्रांती. आधुनिक जीवनशैलीत काम आणि वैयक्तिक आयुष्य यामधील समतोल टिकवण्याची ही एक क्रांतिकारी पायरी मानली जात आहे.

युनायटेड अरब अमिराती

या नव्या नियमाची सुरुवात युनायटेड अरब अमिरातीत झाली, जेथे 2022 पासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरुवातीला 4.5 दिवसांचा आठवडा ठेवण्यात आला. त्यात अडीच दिवसांची सुट्टी होती. नंतर, उन्हाळी काळात 4 दिवसांचा कामकाजाचा आठवडा करून पाहिला गेला आणि त्याचा इतका सकारात्मक परिणाम दिसून आला की सरकारने हा नियम कायमस्वरूपी लागू केला. त्यामुळे दुबईतील नोकरदार वर्गाला आता काम आणि वैयक्तिक जीवन यामध्ये सहज समतोल राखता येतो.

आइसलँड

आइसलँडमधील प्रयोगही तितकाच प्रभावी ठरला. 2015 ते 2019 दरम्यान तिथे 2,500 कर्मचाऱ्यांवर 4 दिवसांच्या कामाच्या आठवड्याचा प्रयोग झाला. या काळात उत्पादकतेत कुठलीही घट झाली नाही आणि कामगार अधिक समाधानी राहिले. त्यामुळे आइसलँडच्या अनेक सरकारी विभागांनी आणि खाजगी कंपन्यांनी हा बदल स्वीकारला आहे.

युनायटेड किंग्डम

युनायटेड किंग्डममध्ये 2022 मध्ये 61 कंपन्यांमध्ये जवळपास 3,000 कर्मचाऱ्यांवर 4 दिवसीय आठवड्याचा प्रयोग झाला. त्यांनी ‘100:80:100’ मॉडेल अवलंबलं, म्हणजे 100% पगार, 80% वेळ, पण 100% कामगिरीची अपेक्षा. या चाचणीचे निकाल इतके सकारात्मक होते की अनेक कंपन्यांनी तो नियम कायमस्वरूपी स्वीकारला.

जपान

जपानसारख्या अत्यंत मेहनती संस्कृतीसाठी हे मोठं पाऊल होतं. मायक्रोसॉफ्ट जपानने 2019 मध्ये 4 दिवसीय कामाचा प्रयोग केला आणि त्यांच्या कंपनीची उत्पादकता थेट 40% ने वाढली. त्यानंतर तिथल्या अनेक कंपन्यांनी या योजनेचा भाग होण्यास उत्सुकता दाखवली आहे.

बेल्जियम

बेल्जियम सरकारने तर थेट कायदाच मंजूर केला. आठवड्यातून 4 दिवस काम आणि 3 दिवस विश्रांती, तेही पगारात कपात न करता. याशिवाय, कर्मचारी ऑफिस वेळेनंतर ईमेल किंवा मेसेजला उत्तर द्यायला बांधील नसतील, असा अधिकारही देण्यात आला आहे.

न्यूझीलंड

न्यूझीलंडमध्येही हे प्रयोग यशस्वी ठरले. तिथल्या एका ट्रस्ट कंपनीने 2018 मध्ये आठवड्याच्या 4 दिवसांच्या कामाच्या प्रणालीची चाचणी घेतली. आठ आठवड्यांच्या या प्रयोगानंतर कर्मचारी अधिक समाधानी राहिले, तणाव कमी झाला आणि कार्यक्षमता वाढली. त्यामुळे हा नियमही तिथे कायम करण्यात आला.

या बदलांमागे एकच उद्देश आहे, लोकांचा मानसिक तणाव कमी करणे आणि जीवनाचा आनंद घेता यावा. अनेक देश आता अशा धोरणांकडे झुकताना दिसत आहेत. कदाचित लवकरच भारतातही असा बदल पाहायला मिळू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!