मागील काही वर्षांमध्ये भारतात डिजिटल क्रांती मोठ्या वेगाने होत आहे आणि त्याचा परिणाम आता सरकारी सेवा आणि कागदपत्रांवरही स्पष्टपणे दिसून येतो. विशेषतः पासपोर्टसारख्या महत्त्वाच्या दस्तऐवजासाठी आता रांगा लावण्याची गरज उरलेली नाही. सरकारने सुरू केलेल्या नवीन ‘मोबाईल पासपोर्ट सेवा’मुळे पासपोर्ट मिळवणं अगदी सहज आणि घरबसल्या शक्य झालं आहे.

पूर्वी पासपोर्टसाठी अर्ज करणे म्हणजे एक मोठे धाडस वाटायचं. ऑनलाइन फॉर्म भरणं, अपॉइंटमेंट मिळवणं, मग पासपोर्ट सेवा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक्स आणि कागदपत्र तपासणी… आणि नंतर पोलिस पडताळणीची वाट पाहणं. ही सगळी प्रक्रिया वेळखाऊ आणि थकवणारी होती. पण सरकारने आता ही सगळी गोष्ट तुमच्या दारात आणून सोपी केली आहे.
मोबाईल पासपोर्ट सेवा
मोबाईल पासपोर्ट सेवा ही खास त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत आहे, जे वृद्ध आहेत, दिवसभर कामात व्यस्त असतात, किंवा शहराच्या गजबजाटापासून लांब गावांमध्ये राहतात. या सेवेअंतर्गत, पासपोर्ट मिळवण्यासाठी फक्त एक ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करावी लागते आणि त्यानंतर ‘पासपोर्ट व्हॅन’ तुमच्या घराच्या दारात येते.
या व्हॅनमध्ये संपूर्ण सेटअप तयार असतो. कॅमेरा, फिंगरप्रिंट स्कॅनर, डाक्युमेंट स्कॅनर अशा सर्व सुविधा. अधिकारी तुमच्या कागदपत्रांची तपासणी करतो, तुमचा फोटो घेतो, आणि बायोमेट्रिक नोंद पूर्ण करतो. अशा प्रकारे, काही मिनिटांत अर्जाची प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर फक्त पोलिस पडताळणी बाकी राहते, जी आता ‘mPassport Police App’ द्वारे अधिक सुलभ झाली आहे.
अपॉइंटमेंट कशी बुक कराल?
जर तुम्हाला ही सेवा हवी असेल, तर www.passportindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करा. नवीन युजर असाल, तर प्रथम नोंदणी करा. नंतर “Apply for Fresh Passport / Reissue” पर्याय निवडा, सर्व माहिती अचूक भरा आणि कागदपत्रं अपलोड करा. अपॉइंटमेंटच्या वेळेस ‘Mobile Passport Service’ हा पर्याय निवडा आणि तुमच्या सोयीप्रमाणे वेळ आणि तारीख ठरवा.
व्हॅन तुमच्या पत्त्यावर पोहोचते आणि अर्जाची प्रक्रिया पूर्ण करते. काही वेळाने पोलिस पडताळणीसाठी स्थानिक पोलीस अधिकारी तुमच्या संपर्कात येतील. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, 15 दिवसांच्या आत तुम्हाला तुमचा पासपोर्ट पोस्टाने मिळेल.
खर्च किती लागेल?
या सेवेचा खर्च 1,500 ते 2,000 रुपये दरम्यान असतो. जर तुम्हाला तातडीने पासपोर्ट हवा असेल, तर काही अतिरिक्त शुल्क लागू शकते. आवश्यक कागदपत्रांत ओळख आणि पत्त्याच्या पुराव्याचे कोणतेही एक अधिकृत दस्तऐवज लागते आणि ‘Annexure-I’ नावाचे प्रतिज्ञापत्रही सादर करावे लागते.