अंकशास्त्राच्या अद्भुत जगात काही संख्यांना एक वेगळीच जादू लाभलेली असते. त्या संख्या केवळ तुमचा स्वभाव सांगत नाहीत, तर तुमचं अंतर्मन, तुमच्या भावना आणि तुमचं जग पाहण्याचा दृष्टीकोनही उलगडतात. अशीच एक संख्या म्हणजे मूलांक 8. एक अशी संख्या, जिच्या मागे गूढतेचा पडदा आहे आणि जी मनाच्या खोल कप्प्यांत हरवलेली असते.
मूलांक 8

कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्म घेणाऱ्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. या मूलांकाचा स्वामी ग्रह शनि असल्याने या व्यक्तींपर्यंत पोहोचणं, त्यांना समजून घेणं, हे खूपच कठीण काम असतं. त्यांच्या चेहऱ्यावर शांतता असते, पण मनात विचारांचा वणवा चालू असतो. एखाद्या समुद्रासारखे, वरून स्थिर, पण आत खोलवर प्रचंड गूढतेने भरलेले.
या लोकांचं आयुष्य साधं कधीच राहत नाही. शनि त्यांना सतत परीक्षा देत राहतो आणि प्रत्येक टप्प्यावर काहीतरी शिकवत राहतो. त्यामुळेच या व्यक्ती लवकर परिपक्व होतात. त्यांचं भावविश्व खूप खोल असतं. एखादं वाक्य ऐकलं तरी ते त्यामागचा अर्थ, त्याचा भावनिक संदर्भ आणि भविष्यातील परिणाम अशा अनेक पातळ्यांवर विचार करू शकतात.
त्यांची ही भावनिक खोली इतकी तीव्र असते की ते अनेक वेळा स्वतःच्या मनातच हरवून जातात. त्यांना एकटं राहणं आवडतं, कारण त्यांना तिथेच स्वतःसाठी उत्तरं मिळत असतात. पण ही एकांताची आवड कधी-कधी त्यांना लोकांपासून दूरही करते. ते कमी बोलतात, पण जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या शब्दांत खोल अर्थ लपलेला असतो. अनेकदा हे लोक आपली दुःखं, शंका किंवा स्वप्न कोणाशी शेअरही करत नाहीत, कारण त्यांना वाटतं की दुसऱ्यांना ते समजणारच नाही.
स्वभाव आणी गुण
विश्वास ठेवण्याचा त्यांचा एक वेगळाच पवित्रा असतो. कोणावरही सहज विश्वास ठेवणं हे त्यांच्या स्वभावात नसतं. विश्वास मिळवायचा असेल, तर वेळ लागतो, सातत्य लागतं, आणि एक अलिखित नातं लागतं. पण एकदा त्यांनी एखाद्यावर मनापासून विश्वास ठेवला, तर ते नातं शेवटपर्यंत जपत राहतात. मात्र, अशा व्यक्तीपर्यंत पोहोचणं हीच एक मोठी परीक्षा असते.
मूलांक 8 असणाऱ्या व्यक्ती बहुतेक वेळा इतरांना गोंधळात टाकतात. कधी खूप गप्पगार, तर कधी अतिशय तल्लख. त्यांच्या मनाचा थांगपत्ता लागणं कठीण असतं. पण जेव्हा कोणी त्यांच्या या खोल अंतरंगाला समजून घेतं, त्यांच्या मूक विचारांमध्ये सामील होतं, तेव्हा ते व्यक्तिमत्त्व फुलू लागतं. एक असं फूल, जे आधी गूढ वाटतं, पण जवळ गेल्यावर त्याची प्रत्येक पाकळी अर्थपूर्ण भासत जाते.