आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय कोणता असेल, तर तो म्हणजे लग्न. दोन व्यक्तींचं एकत्र येणं, एकमेकांच्या भावनांना समजून घेणं, आयुष्यभर साथ देण्याचं वचन हे काही सहजसोपं नाही. म्हणूनच अनेकजण कुंडली, राशी, ग्रह, नक्षत्र, आणि हल्ली अंकशास्त्रालाही महत्त्व देतात. कारण काही नातेसंबंध सुरुवातीला गोड वाटतात, पण पुढे जाऊन त्यात सतत वाद, गैरसमज आणि मानसिक त्रास उद्भवतो. अंकशास्त्राचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते माणसाच्या स्वभावाचा खोल अभ्यास करून दोघांमधील साम्य किंवा संघर्षाचा अंदाज देतं.

मूलांक 1 आणि मूलांक 8
मूलांक 1 आणि मूलांक 8 यांचा असाच एक अनोखा संघर्ष असतो. वरवर पाहता या दोघांमध्ये आकर्षण वाटतं, पण प्रत्यक्षात त्यांचं आयुष्य एकत्र फारसं सुरळीत चालत नाही. मूलांक 1 म्हणजे सूर्याच्या प्रभावाखाली असणारा आत्मविश्वासू, उत्साही, नेतृत्व करणारा स्वभाव. या लोकांना जीवनात सतत पुढे जायचं असतं, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे असतात आणि त्यांना कोणताही अंकुश आवडत नाही. दुसरीकडे मूलांक 8 हा शनीच्या प्रभावाखाली येणारा गंभीर, शिस्तप्रिय, आणि खूप मेहनती व्यक्तिमत्त्व. पण त्याचबरोबर त्यांच्यात एक प्रकारची अंतर्मुखता, शांतता आणि थोडीशी कठोरता असते. हे लोक अनेकदा आपल्या भावना व्यक्त करत नाहीत आणि जरा हट्टीही असतात.
स्वभाव आणि गुण
हीच दोघांमधील पहिली ठिणगी असते. एक जण मोकळा, रोमँटिक आणि उत्साही तर दुसरा थोडा शांत, विचारपूर्वक आणि नियंत्रण ठेवणारा. जेव्हा एकजण मुक्ततेसाठी धडपडतो आणि दुसरा जबाबदारीच्या बेड्या घालतो, तेव्हा संबंधांमध्ये तणाव निर्माण होतो. मूलांक 1 ला कौतुक हवं असतं, तर 8 क्रमांकाचा जोडीदार तो भावनिक आधार वेळेवर देऊ शकत नाही. आणि इथूनच सुरू होतात भांडणं, गैरसमज, आणि सततचा मानसिक ताण.
आर्थिक बाबतीतही त्यांच्यात मोठा विरोधाभास असतो. 1 क्रमांकाचे लोक खर्चिक स्वभावाचे असतात. त्यांना लक्झरी, नवीन गोष्टी, आणि झगमगाट आवडतो. त्याउलट 8 क्रमांकाचे लोक पैसा आणि सुरक्षिततेला महत्त्व देतात. त्यांच्या दृष्टिकोनात अर्थसंकल्प आणि भविष्याची तयारी गरजेची असते. या भिन्नतेमुळे जोडीदारांमध्ये वादाचे नवीन कारणं निर्माण होतात.
करिअर
कारकीर्द आणि जीवनाच्या गतीविषयीही दोघांचे विचार भिन्न असतात. 1 क्रमांकाचे लोक जलद यशाच्या मागे असतात, त्यांना झपाट्याने यश हवं असतं. 8 क्रमांकाचे लोक मात्र शांतपणे, संघर्षातून मार्ग काढत यश मिळवण्यावर विश्वास ठेवतात. हे भिन्न वेग त्यांच्या नात्याला नाजूक बनवतो. 1 चा उतावळेपणा आणि 8 चा धीमेपणा एकमेकांना समजायला फार कठीण जातो.
कोणता जोडीदार ठरेल बेस्ट?
म्हणूनच अंकशास्त्र सांगतं की,मूलांक 1 आणि मूलांक 8 यांचं नातं फार काळ टिकावं, यासाठी खूप समजूतदारपणा आणि सहनशीलता लागते. आणि ती दोघांमध्ये असेलच असं नाही. म्हणूनच, ज्यांचा मूलांक 1 आहे, त्यांच्यासाठी 2, 3, 5, 6 आणि 9 क्रमांकाचे लोक उत्तम जोडीदार ठरतात. त्यांच्याशी संवाद, भावना आणि उर्जा जुळून येते. तसंच, मूलांक 8 साठी 2, 4, 6 आणि स्वतःचा 8 क्रमांक हे जास्त स्थिर आणि समंजस संबंध देतात.