जगात अनेक लोक आपल्या नशिबाला, संघर्षाला किंवा यशाच्या विलंबाला एकच प्रश्न विचारतात “हे इतकं कठीण का आहे?” अनेकदा त्याचं उत्तर आपल्या जन्मतारखेत दडलेलं असतं. अंकशास्त्र, म्हणजेच जन्मतारखांवर आधारित जीवनाचा गूढ अभ्यास, यामध्ये असा विश्वास आहे की काही लोक या जन्मात मागच्या जन्माचे अपूर्ण कर्म आणि ऋण घेऊन येतात. हे ऋण म्हणजे फक्त काही चुकीच्या कृत्यांचे परिणाम नाहीत, तर काही अधूरी जबाबदाऱ्या, अविचारी वागणूक, किंवा नात्यांमधील बेपर्वाईचा भार असतो. आणि म्हणूनच अशा लोकांना यश मिळवण्यासाठी आयुष्यात अधिक संघर्ष करावा लागतो.
हिंदू धर्मात पुनर्जन्म आणि कर्माचा सिद्धांत फार गडद आहे. ‘जे पेराल, ते उगवेल’ ही संकल्पना अगदी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर लागू होते. असं मानलं जातं की मागील जन्मात जर एखाद्याने काही चांगली कर्म केली असतील, तर या जन्मात त्याला त्याचे फळ नक्की मिळते. आणि जर उलट परिस्थिती असेल म्हणजेच अर्धवट जबाबदाऱ्या, स्वार्थी वर्तन किंवा भावनांची नासधूस झाली असेल, तर तेच ऋण आपल्या पाठीशी चिकटून राहतं.

अंकशास्त्रात मूलांक, म्हणजेच आपल्या जन्मतारखेतील संख्यांची बेरीज, यावरून हे कर्म समजण्याचा प्रयत्न केला जातो. विशेषतः काही विशिष्ट तारखा अशा असतात की ज्यांवर जन्म घेतलेल्या लोकांमध्ये मागील जन्माचे ऋण असण्याची शक्यता अधिक असते. उदाहरणार्थ, 1, 2, 4, 7, 13, 14, 16, 19 आणि 25 या तारखांवर जन्मलेले अनेक लोक त्यांच्या वाट्याला येणाऱ्या अडथळ्यांमुळे अचंबित होतात. कारण, त्यांच्या यशात एक विलंबाची सावली सतत असते, जणू काही नियतीने त्यांचं परिश्रम घेऊनच पुढे जाण्याचं ठरवलं असावं.
मूलांक 1
मूलांक 1 असलेले लोक म्हणजे जे 1, 10, 19, 28 तारखेला जन्मतात त्यांचं जीवन सूर्यप्रमाणे तेजस्वी असतं, पण या तेजाखाली अनेकदा एकटेपणाची छाया असते. मागील जन्मात आपल्या अहंकारामुळे किंवा इतरांच्या भावना दुर्लक्षित केल्यामुळे, या जन्मात त्यांना नात्यांमध्ये तडजोड करावी लागते. त्यांच्या यशामागे प्रामाणिक परिश्रम असतो, पण ते यश उशिरा मिळतं.
मूलांक 2
मूलांक 2 असलेले, म्हणजे 2, 11, 20 आणि 29 तारखांना जन्मलेले लोक भावनांनी भरलेले असतात. पण त्यांच्या हळव्या स्वभावामुळे त्यांच्या निर्णयक्षमतेवरही परिणाम होतो. यामुळे त्यांच्या कामात अनेकदा अडथळे येतात. ते खूप चांगले मनाने असले तरी भावनिक अस्थिरतेमुळे यश त्यांना लवकर मिळत नाही. पण एकदा का त्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकलं, की ते आश्चर्यकारक उंची गाठू शकतात.
मूलांक 4
मूलांक 4 म्हणजे 4, 13, 22, 31 या तारखांना जन्मलेले लोक. त्यांच्या आयुष्यात एक प्रकारचा विरोध आणि बंडखोरी असते. मागील जन्मात जबाबदाऱ्यांपासून पळ काढल्यामुळे या जन्मात नियती त्यांना थांबवून थांबवून शिकवत राहते. विशेषतः 13 तारखेचा उल्लेख अनेकदा ‘कर्मभोग’ दिन म्हणून होतो.
मूलांक 7
मूलांक 7 असलेले म्हणजे 7, 16, 25 या तारखांवर जन्मलेले लोक. यांचं आयुष्य आध्यात्मिक शोध, अंतर्मुखता आणि कधी कधी गूढतेने भरलेलं असतं. त्यांच्या मागील जन्मात काही दैवी जबाबदाऱ्या दुर्लक्षित झाल्या असल्यामुळे, या जन्मात त्यांना सतत एक मानसिक वादळ भोगावं लागतं. विशेषतः 16 तारखेला जन्मलेले अनेक लोक अपरीक्षित आघातांना सामोरं जातात.
मूलांक 5
मूलांक 5 म्हणजे 14 आणि 23 या तारखांना जन्मलेले लोक अत्यंत बुद्धिमान आणि झपाट्याने निर्णय घेणारे असतात. पण गतजन्मातील जबाबदाऱ्यांपासून पलायन केल्यामुळे या जन्मात ते जीवनाच्या सर्व अंगांनी बांधले जातात. त्यांच्या यशामागे संयम आणि सातत्याची गरज असते.
अशा अडचणींवर उपाय शोधण्याचा मार्ग अंकशास्त्रातही दिला आहे. काही सोप्या गोष्टी जसं की तांब्याचं नाणं पर्समध्ये ठेवणं, सूर्य किंवा चंद्राला जल अर्पण करणं, विशेष मंत्रांचा जप करणं हे उपाय आत्मिक शांती आणि ऊर्जा संतुलनासाठी मदत करू शकतात. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपल्या कर्मांची जबाबदारी स्वतः घेणं आणि त्या अनुभवांतून शिकत पुढं जाणं हेच खरं परिवर्तन घडवून आणू शकतं.