कसोटी क्रिकेट हा संयम, तंत्र आणि सहनशीलतेचा कस असतो. येथे एकेक धाव जपून काढावी लागते आणि विकेट राखणे हाच प्रमुख हेतू असतो. पण तरीही शतकं, द्विशतकं करणारे काही फलंदाज इतके सावध होते की त्यांनी संपूर्ण कारकिर्दीत एकही षटकार मारला नाही! होय, हे ऐकायला जरा विचित्र वाटेल, पण क्रिकेटच्या इतिहासात असे काही दिग्गज आहेत ज्यांनी हजारो धावा केल्या, पण हवेतून सीमारेषा ओलांडणारा एकही चेंडू मारला नाही. या खास यादीत भारताचा एक सुप्रसिद्ध फलंदाजही आहे.

बिल पोन्सफोर्ड
सर्वात आधी नाव घ्यावं लागेल ऑस्ट्रेलियाच्या बिल पोन्सफोर्ड यांचं. 1920 च्या दशकातील या खेळाडूने केवळ 29 कसोटी सामने खेळून 48.22 च्या सरासरीने तब्बल 2,122 धावा केल्या. त्याच्या खात्यात 7 शतके आणि 6 अर्धशतके होती. पण या कसोटी सामन्यांमध्ये तो एकदाही षटकार मारू शकला नाही. त्याचा खेळ संयमी आणि शिस्तबद्ध होता.
ग्लेन टर्नर
यानंतर आहे न्यूझीलंडचा ग्लेन टर्नर, ज्याने 41 कसोटीत जवळपास 45 च्या सरासरीने 2,991 धावा केल्या. त्याची सर्वोच्च खेळी होती 259 धावांची, पण त्याने एकदाही चेंडू सीमारेषेच्या पलीकडे हवेतून नेला नाही. त्याच्या खेळात जोखमीची तयारी नव्हती.
जोनाथन ट्रॉट
इंग्लंडचा जोनाथन ट्रॉट हा नावाजलेला फलंदाजही या यादीत आहे. 44.08 च्या सरासरीने 3,835 धावा करताना त्याने 9 शतके आणि 19 अर्धशतके केली. पण कसोटीत एकही षटकार त्याच्या बॅटमधून बाहेर पडला नाही.
विजय मांजरेकर
या यादीतील भारताचा प्रतिनिधी म्हणजे विजय मांजरेकर. 1950 आणि 60 च्या दशकात भारताच्या फलंदाजीचा आधारस्तंभ ठरलेले मांजरेकर यांनी 55 कसोटी सामने खेळून 3,208 धावा केल्या. त्यांनी 7 शतके मारली, पण एकही षटकार नाही! त्यांच्या काळात हवेतून मोठे शॉट मारणे ही शैली फारशी चालत नव्हती, पण तरीही अशी कामगिरी दुर्मिळच मानावी लागेल.
जेफ्री बॉयकॉट
ही यादी पूर्ण होते इंग्लंडच्या जेफ्री बॉयकॉटसारख्या फलंदाजांवर, ज्यांचा संयम ही त्यांची ओळख होती. आजच्या टी-20 आणि ODI क्रिकेटमध्ये, षटकारशिवाय खेळाची कल्पनाही करता येणार नाही. पण कसोटी क्रिकेटमधील या महान फलंदाजांनी दाखवून दिलं की, मोठे स्कोअर फक्त आक्रमक खेळानेच होत नाहीत, तर संयम आणि तंत्राची गाठ बसवली की इतिहास घडतो.