पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे हे गेल्या काही वर्षांत नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. भारताच्या जागतिक स्थानाला बळकटी देण्यासाठी हे दौरे जरी आवश्यक मानले जात असले, तरी त्यावर होणारा खर्च आणि त्याची उपयुक्तता यावरून विरोधकांनी अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, या दौऱ्यांचा खर्च किती झाला आणि कोणता दौरा सर्वात महागडा ठरला, यावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रीत झालं आहे.

राज्यसभेत नुकतीच मांडण्यात आलेली माहिती सांगते की 2021 ते 2025 या कालावधीत पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर एकूण 362 कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. कोविडच्या निर्बंधांनंतर प्रवास सामान्य होताच, मोदींचे आंतरराष्ट्रीय दौरे पुन्हा सुरू झाले आणि त्यासोबतच खर्चातही सातत्याने वाढ झाली.
चार वर्षांतील दौऱ्यांचा खर्च
2021 मध्ये या दौऱ्यांवर 36 कोटी रुपये खर्च झाला, तर 2022 मध्ये तो 55 कोटींवर पोहोचला. पुढील वर्षी म्हणजे 2023 मध्ये हा खर्च थेट 93 कोटी रुपयांपर्यंत गेला आणि 2024 मध्ये सर्वाधिक 100 कोटी रुपये खर्च झाले.
2025 मधील दौरे आणि खर्च
2025 मध्ये आतापर्यंत पंतप्रधानांनी 14 देशांना भेटी दिल्या असून या दौऱ्यांवर एकूण 66.8 कोटी रुपये खर्च झाले आहेत. यामध्ये फ्रान्समध्ये झालेला दौरा सर्वाधिक खर्चिक ठरला. एकट्या या दौऱ्यावर 25.5 कोटी रुपये खर्च झाला. अमेरिकेच्या दौऱ्याचा खर्च 16.5 कोटी, सौदी अरेबियाचा 15.5 कोटी, थायलंडचा 4.9 कोटी आणि श्रीलंकेचा 4.4 कोटी इतका होता.
या दौऱ्यांमागे अनेक घटकांचा विचार केला जातो. जसं की प्रवासाचं अंतर, कार्यक्रमाचा कालावधी, प्रतिनिधींची संख्या, स्थानिक कार्यक्रमांची व्याप्ती आणि सुरक्षा व्यवस्थापन. त्यामुळे प्रत्येक दौऱ्याचा खर्च हा त्या देशाशी संबंधित परिस्थितीवर अवलंबून असतो.
सर्वात महागडा दौरा कोणता?
आतापर्यंतचा सर्वात महागडा दौरा कोणता, असं बघायचं झाल्यास तो अमेरिकाचा ठरला. गेल्या काही वर्षांत पंतप्रधान मोदी चार वेळा अमेरिकेला गेले असून या चार दौऱ्यांवर एकूण 74.44 कोटी रुपये खर्च झाला. फ्रान्स त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तीन दौऱ्यांवर 41.29 कोटी रुपये खर्च. जपानच्या तीन दौऱ्यांचा खर्च 32.96 कोटी रुपये झाला आहे.