श्रावण महिन्यात निसर्गाचा नवा रंग दिसतो, आकाश ढगांनी भरून येतं, आणि प्रत्येक कोपऱ्यात उत्सवांची चाहूल लागते. या पावसाळी वातावरणात एक विशेष दिवस येतो, नाग पंचमी. या दिवशी आपल्या संस्कृतीतील सर्पदेवतांचा सन्मान केला जातो, त्यांना पूजलं जातं, आणि त्यांच्या प्रती आभार व्यक्त केले जातात. नाग पंचमी म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि पुरातन कथांचा संगम. यंदा नाग पंचमी 29 जुलै 2025 रोजी साजरी केली जाणार आहे, आणि त्याला खास धार्मिक महत्त्व आहे.

नाग पंचमी शुभ मुहूर्त
या वर्षी पंचमी तिथी 28 जुलैच्या रात्री 11:24 वाजता सुरू होईल आणि 30 जुलैच्या पहाटे 12:46 वाजता संपेल. पण उदयातिथी प्रमाणे, म्हणजे सूर्य उगवल्यावर जी तिथी असेल, त्या हिशोबाने नाग पंचमी 29 जुलै रोजी साजरी केली जाईल. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 5:41 ते 8:23 पर्यंत असेल. याच काळात नाग देवतेची विधिवत पूजा करून आशीर्वाद मिळवण्याची परंपरा आहे.
आपल्या पूर्वजांनी सर्पाला फक्त प्राणी म्हणून नव्हे, तर एक दैवी रूप मानले आहे. असे मानले जाते की नाग पंचमीच्या दिवशी सर्पदेवतेची पूजा केल्याने कुंडलीतील कालसर्प दोष शमतो. हा दोष असल्यास जीवनात अनेक अडथळे येतात, विशेषतः विवाह, करिअर, आरोग्य यामध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे या दिवशी नाग पूजनाने या दोषांचे प्रभाव कमी होतात, तसेच पितृदोषापासूनही मुक्ती मिळते, असं शास्त्र सांगतं.
दुध अर्पण करण्यामागील पौराणिक कथा
या दिवशी नाग देवतेला दूध अर्पण करण्याची प्रथा देखील खूप महत्त्वाची आहे. गायीच्या दुधात तूप आणि साखर मिसळून ते नागाला अर्पण केल्यास विशेष पुण्य मिळते. यामागे एक पुरातन कथा आहे जी महाभारताशी संबंधित आहे. कथा अशी की राजा जन्मेजय आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी एक यज्ञ आयोजित करतो. या यज्ञात अनेक साप होमले जातात, पण आस्तिक मुनींनी त्या सापांचा जीव वाचवला. त्यांनी सर्पांना दुधाने स्नान घालून त्यांची वेदना शांत केली. ही घटनाच पुढे नाग पंचमीच्या पूजेचा पाया ठरली.
पूजा पद्धत
या दिवशी सापाला फक्त दुध अर्पण करून थांबायचं नसतं. अनेक ठिकाणी नागाचे चित्र किंवा मातीची मूर्ती तयार केली जाते. स्वच्छ वस्त्र घालून, नागाच्या मूर्तीसमोर हळद, रोली, अक्षता, फुले अर्पण केली जातात. त्यानंतर साखर-तूप घालून दूध नाग देवतेला अर्पण केलं जातं. पूजेनंतर नाग पंचमीची पारंपरिक कथा ऐकली जाते आणि शेवटी आरतीने पूजन पूर्ण होतं.