भारतातील ‘या’ राज्यात अजूनही रेल्वे पोहोचली नाही; कधी मिळणार पहिली ट्रेन?

आपण भारतात कुठेही प्रवास केला तरी, ‘रेल्वे’ हा एक महत्त्वाचा प्रवासाचा भाग असतो. कुठल्याही कोपऱ्यात जावं, एखादं स्टेशन सापडेलच अशी आपली समजूत असते. पण जर कोणी सांगितलं की भारतात एक संपूर्ण राज्य आहे जिथे एकही रेल्वे स्टेशन नाही, तर? होय, हे खरं आहे आणि हे राज्य म्हणजे सिक्कीम.

भारताचं हे छोटं पण अतिशय निसर्गरम्य राज्य, 16 मे 1975 रोजी देशात 22 वं राज्य म्हणून सामील झालं. पण आजही, तब्बल 50 वर्षांनंतरसुद्धा, इथे एकही रेल्वे ट्रॅक नाही. देशात दररोज 23,000 पेक्षा जास्त गाड्या धावत असताना, आणि सुमारे 3 कोटी लोक रेल्वेचा वापर करत असताना, सिक्कीमच्या लोकांसाठी अजूनही रेल्वे प्रवासाचा पर्याय नाही.

सिक्कीमला पोहोचण्यासाठी प्रवाशांना अजूनही पश्चिम बंगालमधील सिलिगुडी किंवा जलपाईगुडी स्टेशनवर उतरावं लागतं. तेथून पुढे मग बसने किंवा टॅक्सीने प्रवास करावा लागतो. भारतात आज झपाट्याने मेट्रो शहरांपर्यंत वेगवान ट्रेन पोहोचत असताना, सिक्कीम अजूनही यापासून वंचित का आहे? असा प्रश्न सर्वांनाच पडतो.

सिक्कीममध्ये ट्रेन का नाही ? याचं उत्तर पाहिलं तर, कारण आहे भौगोलिक अडथळे. सिक्कीमचा भूप्रदेश डोंगराळ, खडकाळ आणि अतिशय संवेदनशील आहे. इथल्या तीव्र उतारांमुळे आणि खोल दऱ्यांमुळे इन्फ्रास्ट्रक्चर उभारणं अत्यंत कठीण आहे. याशिवाय, इथलं हवामान सुद्धा एक आव्हान आहे. कधी अचानक पाऊस, कधी बर्फवृष्टी, कधी ढगफुटी सगळंच अनिश्चित.

मात्र, आता केंद्र सरकारने सिक्कीममध्ये रेल्वे आणण्याच्या दिशेने पुढाकार घेतला आहे. सध्या सिलिगुडीहून सिक्कीमची राजधानी गंगटोकपर्यंत रेल्वे ट्रॅक टाकण्याचा प्रकल्प सुरू आहे. हा प्रकल्प 2029-30 पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. एकदा हा मार्ग तयार झाला की, सिक्कीमचाही समावेश भारताच्या मुख्य रेल्वे जाळ्यात होईल.

भारतीय रेल्वे जगात चौथ्या क्रमांकावर आहे आणि देशभरातील सुमारे 7,000 स्थानकांतून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. वंदे भारत, राजधानी, शताब्दी, दुरांतो यांसारख्या गाड्या प्रवासाचा दर्जा अधिक उंचावतात. आता सिक्कीममध्येही लवकरच पहिली ट्रेन येणार आहे. यासाठी प्रकल्प सुरू देखील झाला आहे.