अनेक घरांमध्ये सकाळची सुरुवात होते ती भगवान हनुमानाच्या नावाने. त्यांच्या भक्तांमध्ये असलेली निष्ठा आणि श्रद्धा इतकी खोल रुजलेली आहे की संकटात सापडलेला कोणताही माणूस पहिल्यांदा “जय हनुमान” म्हणतो. हनुमानजींना ‘संकटमोचन’ का म्हणतात, याचं उत्तर त्यांच्या भक्तीमधून मिळतं. हनुमान चालीसा ही त्यांच्या स्तुतीची अशी एक प्रभावी रचना आहे, जी मनाच्या खोल गुंत्यांतून मार्ग दाखवते. पण केवळ पाठ करून उपयोग नाही, ते कुठल्या वेळेला आणि कशा भावनेने म्हटलं जातं, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे.

हनुमान चालीसा हा एक असा मंत्र आहे, जो केवळ शब्दांचा गुंता नसून, त्यामागे असते एक शक्तिशाली भावना, विश्वास आणि मानसिक स्थैर्य. असे म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीने पूर्ण भक्तिभावाने आणि योग्य काळात हनुमान चालीसेचे पठण केले, तर त्याला मानसिक, शारीरिक आणि अध्यात्मिक त्रासांपासून मोठा दिलासा मिळतो. त्याचे परिणाम फक्त रोग किंवा भय यावरच नाहीत, तर मनातल्या खोल भीती, असुरक्षितता आणि नकारात्मक विचारांवरही प्रभावी ठरतात.
मंगळवार आणि शनिवार
मंगळवार आणि शनिवार हे दोन दिवस हनुमानजींसाठी विशेष मानले जातात. या दिवशी हनुमान चालीसेचे पठण केल्याने जीवनात आलेले अडथळे, ग्रहदोष आणि दु:ख दूर होण्यास मदत होते, असे शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे. या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी, पूजा करून दिवा लावल्यावर चालीसा म्हणण्याची पद्धत रूढ आहे. त्या क्षणी, मन शांत आणि एकाग्र ठेवून, भावपूर्णतेने केलेले पठण आपल्या मनोवृत्तीला नवीन उर्जा देतं.
हनुमान चालीसा पठन वेळ
पण यामध्ये अजून एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी आहे, ब्रह्म मुहूर्त. आयुर्वेद आणि धर्मशास्त्रांनुसार, सूर्योदयापूर्वीचा हा काळ मानसिक आणि शारीरिक शुद्धतेसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. या वेळी हनुमान चालीसा पठण केल्यास मन अधिक स्थिर राहतं, आणि त्याचा प्रभावही खोलवर जाणवतो. तसेच, रात्री झोपण्यापूर्वी चालीसा म्हटलं तर संपूर्ण दिवसातील चिंता आणि अस्वस्थता दूर होऊन, शांत झोप लागते.
हनुमान चालीसा पठण करताना केवळ उच्चार नाही, तर त्यामागचा भाव, मनाची स्वच्छता आणि जागरूकता हाच खरा प्रभाव आहे. पठणाच्या आधी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करणं, देवतेसमोर दिवा, धूप लावणं, लाडू किंवा चुरमा अर्पण करणं ही सगळी प्रक्रिया आपल्याला बाह्य पातळीवर सज्ज करत असते. पण खरी तयारी होते आपल्या मनाची. पठणानंतर 108 वेळा रामाचे नाव घेणं ही एक प्रकारची अंतर्मुखी प्रार्थना असते, जी भक्ताला अधिक गहिरं आध्यात्मिक बळ देते.