प्रेम असले तरी भांडणं टाळता येत नाहीत. कारण दोन वेगवेगळ्या व्यक्तींचा एकत्र प्रवास म्हणजेच नातं. भांडणं ही त्या प्रवासात येणाऱ्या खाचखळग्यांसारखी असतात. पण भांडणानंतर जे घडतं, ते खऱ्या नात्याची कसोटी असते. काहीजण अबोला धरतात, काही मुद्दाम दुर्लक्ष करतात. पण अशाने नातं सावरत नाही, उलट तुटण्याच्या उंबरठ्यावर पोहोचू शकतं. म्हणूनच भांडण संपल्यावर जोडीदाराशी संवाद सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

संवादाची सुरुवात कशी कराल?
भांडण झाल्यावर लगेच संवाद साधू नये. दोघांचाही राग थोडा शांत होऊ द्या. काही मिनिटे स्वतःला शांत करण्यासाठी द्या. 2-3 वेळा खोल श्वास घ्या, स्वतःलाच आठवा की, “आपण भांडण संपवण्यासाठी नाही, तर समाधानासाठी बोलणार आहोत.” ही मानसिक तयारी झाल्यावरच संवाद सुरू करा.
संवादाची सुरुवात कशी करायची यालाही खूप महत्त्व आहे. “माझं मत तुला सांगायचं होतं”, “आपण दोघं मिळून हे सोडवू शकतो”, अशी सौम्य वाक्यं निवडा. आवाजात प्रेम , शब्दांमध्ये आदर असल्यास, ही लहानशी काळजी तुमचं नातं बिघडण्याऐवजी अधिक घट्ट करते.
टोमणे मारू नका
भांडणाचा मुद्दा मांडताना, दोष देणं टाळा. “तू नेहमीच असं करतोस/करतेस” असं म्हणणं जोडीदाराला राग आणू शकतं. त्याऐवजी, “तेव्हा मला असं वाटलं” असं सांगितल्यास त्यांना तुमचं म्हणणं अधिक समजेल. संवाद म्हणजे टोमणे नाहीत, तर भावना मोकळेपणाने बोलण्याची संधी.
नातं टिकवण्यासाठी पुढाकार घ्या
यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मुद्दा जिंकण्यासाठी नव्हे, तर नातं टिकवण्यासाठी बोलणं. समस्या सुटली, माफी मागितली आणि दिली तर पुढचा प्रवास अधिक प्रेमळ होतो. जोडीदाराच्या भावनांना समजून घेऊन, दोघांनी मिळून भविष्यात अशा वादांना कसे टाळता येईल यावर लक्ष केंद्रित करा.