चौथ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला दिलासा! ‘या’ खेळाडूच्या कमबॅकची शक्यता, आता कशी असेल प्लेइंग XI?

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत दोन्ही संघांनी एकमेकांना चांगलीच झुंज दिली आहे. मात्र भारतीय संघासाठी ही मालिका काहीशी संघर्षमय ठरत आहे, विशेषतः खेळाडूंच्या सातत्याने होणाऱ्या दुखापतींमुळे. अशा काळात, संघासाठी एक मोठा दिलासा म्हणजे ऋषभ पंतचे तंदुरुस्त होणं. ही बातमी चाहत्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू फुलवणारी ठरली आहे.

ऋषभ पंत करणार कमबॅक?

लॉर्ड्स कसोटीत विकेटकीपिंग करत असताना पंतच्या डाव्या हाताच्या तर्जनीला चेंडू लागला होता, ज्यामुळे त्याला खेळ सोडावा लागला. त्यानंतरच्या डावात पंत मैदानावर दिसला खरा, पण यष्टीमागे नाही. त्याच्या जागी ध्रुव जुरेलने विकेटकीपिंगची जबाबदारी पार पाडली, जरी तो मूळ प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. पंतने त्या सामन्यात 74 आणि 9 अशा एकूण 83 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात तो आणखी काही काळ खेळला असता, तर भारताचा पराभव टळलाही असता. सामना अवघ्या 22 धावांनी गमावण्यात आला आणि मालिकेत भारत 1-2 ने पिछाडीवर गेला.

मात्र आता पंत पुन्हा मैदानावर दिसत असून विकेटकीपिंगचा सराव करत आहे, हे पाहून स्पष्ट होते की तो फिट झाला आहे. त्याचे संघात असणे म्हणजे केवळ एका यशस्वी यष्टीरक्षकाचे पुनरागमन नाही, तर एक स्फोटक फलंदाज परत आला आहे. आतापर्यंत या मालिकेत त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावून संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

इतर खेळाडूंच्या दुखापतीने वाढवलं टेंशन

दुसरीकडे, संघातल्या इतर खेळाडूंच्या दुखापती मात्र चिंता वाढवत आहेत. अर्शदीप सिंग आता चौथ्या कसोटीतून बाहेर झाला आहे, आकाश दीपच्या तंदुरुस्तीबाबत अजूनही स्पष्टता नाही, आणि युवा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीला गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर जावं लागलं आहे. या सगळ्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल अपरिहार्य ठरणार आहेत.

शार्दुल ठाकूरचं संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे, तर करुण नायरच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 8 वर्षांनी कसोटी संघात परतलेला हा फलंदाज अद्याप प्रभाव टाकू शकलेला नाही, त्यामुळे त्याच्या जागेवर दुसरा पर्याय पाहिला जाऊ शकतो.