घर न तोडता वास्तुदोष दूर करा, ‘या’ साध्या पद्धतींनी आरोग्य आणि पैसा दोन्ही मिळवा!

आपले घर हे केवळ भिंतींनी बांधलेले नसते, ते आपल्या सुख-दुःखाचं केंद्र असतं. मात्र, कधी कधी घर बांधताना वास्तुशास्त्राकडे दुर्लक्ष केल्यामुळे काही अडचणी येऊ लागतात.जसे की सतत आजारपण, आर्थिक नुकसान, मानसिक ताण आणि घरात वाद. पण अशी समस्या आली म्हणजे घर तोडून नव्याने बांधणे हाच एकमेव पर्याय नसतो. वास्तुशास्त्रात असे काही उपाय सांगितले आहेत, जे तुम्ही घर न तोडता अमलात आणू शकता आणि नकारात्मकतेपासून मुक्त होऊ शकता.

स्वयंपाकघर

सर्वप्रथम स्वयंपाकघराबाबत विचार करूया. जर स्वयंपाकघर चुकीच्या दिशेला असेल, तर घाबरून जाण्याची गरज नाही. घर तोडण्यापेक्षा फक्त स्टोव्ह किंवा गॅसचे स्थान योग्य दिशेला म्हणजे आग्नेय कोपऱ्यात (अग्नी कोन) हलवले, तरी त्याचा सकारात्मक परिणाम होतो. अग्नी कोन हा उष्णतेशी संबंधित मानला जातो आणि तिथे स्वयंपाकाची क्रिया केल्यास घरात समृद्धी टिकून राहते.

बेडरूम

शयनकक्षाचा वास्तुदोष दूर करण्यासाठी खोलीची रचना बदलणे शक्य नसेल, तरी झोपण्याची दिशा बदलता येते. दक्षिण-पश्चिम दिशेकडे डोके ठेवून झोपल्याने शरीराला स्थिरता आणि मानसिक शांतता मिळते. या छोट्याशा बदलामुळे झोपही सुधारते आणि तणाव कमी होतो.

पाण्याचे बोअरिंग

अनेक वेळा आपण पाण्याचे बोअरिंग चुकीच्या दिशेने करत असतो. ही चूक दूर करण्यासाठी काही लोकांना बोअरिंगचे स्थान बदलणे शक्य नसते. अशावेळी, त्या ठिकाणी मोटर लावून पाण्याचा मुख्य आउटलेट पूर्व किंवा ईशान्य दिशेला वळवण्याचा उपाय करता येतो. पाण्याशी संबंधित दोष दूर झाला की घरात शांती आणि स्वास्थ्य वाढते.

दरवाजे आणि खिडक्या

घरात नेहमी दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवली तर ताज्या हवेचा आणि नैसर्गिक प्रकाशाचा प्रवेश कमी होतो. त्यामुळे शक्य असल्यास घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला अधिक मोकळीक ठेवावी. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.

एकूणच सांगायचं झालं, तर वास्तुशास्त्रात दिलेले उपाय योजताना घराचे मोठे बदल किंवा तोडफोड करण्याची गरज नाही. केवळ दिशांचे ज्ञान आणि वस्तूंची योग्य मांडणी करूनही तुम्ही तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करू शकता.