लडाखच्या उंच आणि थंड डोंगराळ भागात भारतीय सैन्याने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली आहे. यावेळी मैदानात उतरलं ते अत्याधुनिक आणि पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या ‘आकाश प्राइम’ क्षेपणास्त्राचं एक असं अस्त्र जे आकाशातून येणाऱ्या कुठल्याही धोका नजरेआड न ठेवता, अत्यंत अचूकपणे पाडू शकतं. लडाखमध्ये 15,000 फूटांहून अधिक उंचीवर घेतलेली याची यशस्वी चाचणी फक्त एक तांत्रिक प्रगती नव्हती, तर चीनसारख्या शेजाऱ्याला स्पष्ट इशाराच होता, भारत सज्ज आहे, आणि कोणत्याही परिस्थितीत झुकणार नाही.
‘आकाश प्राइम’ क्षेपणास्त्र

या चाचणीत ‘आकाश प्राइम’ क्षेपणास्त्राने आपल्या क्षमतेचा पूर्ण ताकदीने प्रत्यय दिला. वेगाने हालचाल करणाऱ्या दोन हवाई लक्ष्यांना थेट भेदणं ही साधी गोष्ट नव्हे. पण हे क्षेपणास्त्र केवळ मारकच नाही, तर स्मार्टही आहे. यामध्ये ‘मल्टी-सेन्सर डेटा प्रोसेसिंग’सारखं प्रगत तंत्रज्ञान आहे, जे एकाच वेळी अनेक दिशांमधून येणाऱ्या धोक्यांचा वेध घेऊन त्यांचा सामना करू शकतं. हेच वैशिष्ट्य आकाश प्राइमला S-400 आणि पॅट्रियट यांसारख्या जागतिक दर्जाच्या क्षेपणास्त्र प्रणालींच्या रांगेत उभं करतं, तेही अधिक अचूक आणि कमी खर्चात.
आकाश प्राइम ही आकाश क्षेपणास्त्र मालिकेची पुढची पायरी आहे. आधीच ऑपरेशन सिंदूर दरम्यान आकाश प्रणालीने शत्रू देशाच्या कोणत्याही लढाऊ विमानाला भारतीय हद्दीत पाय ठेवू दिला नव्हता. त्याच्या बळावर अनेक तुर्की आणि चिनी ड्रोनदेखील निष्प्रभ झाले होते. आता आकाश प्राइम ही त्या यशस्वी परंपरेची अधिक सशक्त आवृत्ती आहे, जिला लष्कराच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेजिमेंटमध्ये समाविष्ट केलं जाणार आहे.
आकाश प्राइमची ताकद
हे क्षेपणास्त्र सुमारे 25 ते 30 किमी अंतरावरच्या लक्ष्यांवर हल्ला करू शकतं आणि 4,500 मीटर उंचीवर सहज तैनात करता येतं. हेच नाही तर लष्करी ट्रक किंवा युद्ध टँकवरूनसुद्धा ते सोडलं जाऊ शकतं. म्हणजेच गरज असेल तिथं, जसं असेल तसं, या प्रणालीचा वापर होऊ शकतो.
या यशामागे एक महत्त्वाची गोष्ट आहे ‘स्वदेशीपणा’. भारतात विकसित झालेलं हे क्षेपणास्त्र केवळ तांत्रिक स्वावलंबनाचं प्रतीक नाही, तर त्यामागे भारतीय वैज्ञानिकांची मेहनत, कल्पकता आणि दूरदृष्टी आहे. यामध्ये 90 टक्क्यांहून अधिक अचूकतेने लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे.
भारत सध्या आकाश-एनजी (न्यू जनरेशन) या आणखी प्रगत प्रणालीवर काम करत आहे. तेजपूर, जोरहाट, ग्वाल्हेर, पुणे आणि जलपाईगुडीसारख्या हवाई तळांवर आकाश प्रणाली आधीच तैनात आहे, आणि आता लडाखमधील संवेदनशील वास्तविक नियंत्रण रेषेवरही याची उपस्थिती वाढवली जात आहे.