अंटार्क्टिकाचे विस्तीर्ण बर्फाच्छादित प्रदेश नेहमीच मानवी कुतूहलाचे केंद्र राहिले आहे. पृथ्वीवरील या अतिशय थंड आणि एकाकी भागात अजूनही अशी अनेक रहस्यं दडलेली आहेत, जी आपण पूर्णपणे उलगडलेली नाहीत. आणि अलीकडेच शास्त्रज्ञांच्या एका संशोधनातून असा धक्कादायक दावा करण्यात आला आहे की अंटार्क्टिकाच्या बर्फाखाली एक नवेच ‘जग’ लपलेले असू शकते. एक असं जलप्रवाहांचं जटिल जाळं, जे आजवर आपल्या कल्पनेपलीकडचं होतं.

शास्त्रज्ञांच्या संशोधनात काय आढळले?
बार्सिलोना विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या संशोधनात तब्बल 332 पाणबुडीच्या दऱ्यांचा शोध लावण्यात आला आहे. या दऱ्या इतक्या खोल आहेत की त्यांची खोली 4,000 मीटरपेक्षा अधिक आहे, आणि त्यांचा आढावा आजवरच्या सर्वांत सखोल नकाशांमध्ये घेतलेला आहे. हे शोध हे मागील संशोधनाच्या तुलनेत पाचपट अधिक विस्ताराचे असल्याचे सांगितले जात आहे. यावरून हे स्पष्ट होते की अंटार्क्टिकाची भूगर्भीय रचना जितकी आपण समजतो त्यापेक्षा अनेक पटींनी अधिक गुंतागुंतीची आहे.
पाणबुडीच्या या दऱ्या म्हणजे समुद्राच्या पोटातील लपलेली रचना आहेत. या खोल दऱ्या खंडीय उतारांपासून सुरू होतात आणि खोल समुद्रात पसरतात. त्या किनाऱ्यापासून खोल भागात गाळ, पोषक द्रव्ये आणि थंड पाणी वाहून नेतात. यामुळे समुद्रातील जैवविविधता वाढते, कारण या प्रवाहांमुळे अनेक सजीव प्रजातींना पोषण मिळते. एक अर्थाने या दऱ्या म्हणजे समुद्राच्या गाभ्यातील जीवनाची नाळ आहेत.
भविष्यातील हवामान बदलाचे संकेत
परंतु या दऱ्यांचं महत्त्व फक्त पर्यावरणापुरतंच मर्यादित नाही. या खोल वाटांनी उष्ण आणि थंड पाण्याच्या देवाणघेवाणीला गती दिली जाते. अंटार्क्टिकाच्या बर्फाळ भागांजवळ जेव्हा उष्ण पाणी पोहोचतं, तेव्हा ते बर्फ वितळण्यास कारणीभूत ठरतं. परिणामी, समुद्राची पातळी हळूहळू वाढते.एक प्रक्रिया जी भविष्यातील हवामान बदलाच्या मोठ्या परिणामांचे संकेत देते.
या संशोधनामधून हेही समोर आले आहे की सध्याचे हवामानाचे संगणकीय मॉडेल्स या प्रकारच्या स्थानिक जलप्रवाहांना नीट समजून घेत नाहीत. त्यामुळे हवामान बदलाचा अचूक अंदाज लावणे अवघड जाते. शास्त्रज्ञ यावर भर देत आहेत की अधिक अचूक आणि उच्च-रिझोल्यूशन नकाशे तयार करून, आपण या प्रक्रियांना अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकतो आणि भविष्यातील धोके ओळखू शकतो.