हवामान बदलाचं वास्तव समुद्रात जास्त प्रकर्षानं दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांत समुद्रातील तापमान इतकं वाढलं आहे की, त्यामुळे मासे आणि इतर सागरी जीव अक्षरशः स्थलांतर करू लागले आहेत. 2014 ते 2016 या काळात उत्तर अमेरिका किनारपट्टीच्या पॅसिफिक भागात घडलेली ही सागरी उष्णतेची लाट केवळ एक हवामानशास्त्रीय घटना नव्हती, ती एक मोठा इशारा होती, जो विज्ञानाच्या पातळीवरही शास्त्रज्ञांना हादरवून गेला.

या काळात समुद्राच्या पाण्याचं तापमान नेहमीपेक्षा 2 ते 6 अंश सेल्सियसने जास्त होतं. हा फरक वरवर किरकोळ वाटू शकतो, पण सागरी जीवसृष्टीसाठी ही घातक मर्यादा होती. ही लाट इतकी तीव्र होती की, तिचा परिणाम केवळ समुद्राच्या पृष्ठभागावर नाही, तर खोल पाण्यात राहणाऱ्या हजारो प्रजातींच्या जीवनावर आणि त्यांच्या अधिवासावरही झाला.
शास्त्रज्ञांचं धक्कादायक निरीक्षण
व्हिक्टोरिया विद्यापीठातील बॉम लॅबच्या शास्त्रज्ञांनी 331 संशोधन आणि सरकारी अहवालांचा सखोल आढावा घेतला. या अभ्यासातून स्पष्ट झालं की उष्णतेच्या या लाटेमुळे पश्चिम किनारपट्टीवरचं पर्यावरणीय संतुलन ढासळलं. जवळपास 240 सागरी प्रजातींनी आपली पारंपरिक जागा सोडून सुमारे 1,000 किलोमीटर उत्तरेकडे स्थलांतर केलं. यामध्ये नॉर्दर्न राईट व्हेल डॉल्फिन, सी स्लग्ससारख्या प्रजाती होत्या.
पण गोष्ट इथपर्यंतच थांबली नाही. उष्णतेचा परिणाम केवळ प्रजातींच्या हालचालीपुरता मर्यादित राहिला नाही, तर समुद्रातील अन्नसाखळीही कोलमडली. केल्प जंगले जी समुद्रातल्या अनेक जीवांसाठी जीवनरेषा आहेत ते अक्षरशः नष्ट झाली. केल्प आणि सीग्रास यासारख्या वनस्पतींच्या नाशामुळे अनेक जीवांचे घरच उद्ध्वस्त झाले. समुद्री तारे, पक्षी आणि स्तनधारी प्राणी यांच्या मृत्युदरात लक्षणीय वाढ झाली. Pycnopodia helianthoides नावाची शिकारी प्रजाती तर नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
या सगळ्याचा एक दुष्परिणाम म्हणजे सागरी अन्नसाखळीचं पुनर्रचना. प्लँक्टन समुदायांमध्ये मोठा बदल झाला, जो समुद्राच्या पोषण चक्रावर आणि उत्पादनक्षमतेवर थेट परिणाम करणारा होता. याशिवाय तापमानवाढीमुळे उद्भवणाऱ्या रोगांनीही जीवसृष्टीला त्रस्त केलं. शिकारी प्रजातींसाठी अन्नाचा अभाव झाला, आणि त्यांचं जगणं कठीण झालं.
मत्स्य व्यवसायाला मोठा फटका
आणि यातून निर्माण झालेलं आर्थिक नुकसानही कमी नव्हतं. मत्स्य व्यवसायाला जबरदस्त फटका बसला. काही प्रादेशिक केंद्रांना आपलं काम बंद करावं लागलं, आणि यामुळं लाखो डॉलर्सचं नुकसान झालं. पर्यावरणीय असमतोल, रोगांचा प्रसार आणि प्रजातींमधील बदल यांमुळे ह्या नुकसानात अधिक भर पडली.