एका प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये झळकणारी आणि संपूर्ण देशाच्या मनात घर करणारी अभिनेत्री जेव्हा अचानक छोटा पडदा सोडते, तेव्हा तिच्या पुढील प्रवासाची उत्सुकता साहजिकच वाढते. अशीच कहाणी आहे आशका गोराडियाची. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये दोन दशकांहून अधिक काळ घालवलेली ही अभिनेत्री आज कोट्यवधींच्या कंपनीची मालक आहे आणि तिचा प्रवास फक्त मनोरंजनविश्वापुरता मर्यादित नाही, तर ती आता एक यशस्वी महिला उद्योजिका म्हणूनही ओळखली जाते.

आशका गोराडियाचा प्रवास
2002 मध्ये ’37 साल बाद’ या टीव्ही शोमधून आशकाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर ‘भाभी’, ‘तुम बिन जाओं कहां’, ‘कुसुम’, ‘क्युंकी सास भी कभी बहू थी’, ‘नागिन’, ‘सिंदूर तेरे नाम का’ अशा अनेक मालिकांमध्ये ती झळकली. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आणि एकता कपूरच्या शोमुळे ती घराघरात पोहोचली. पण आशकाचा प्रवास केवळ काल्पनिक मालिकांपुरताच मर्यादित राहिला नाही. ती ‘बिग बॉस 6’, ‘झलक दिखला जा 4’, ‘नच बलिये 8’ आणि ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 4’ या रिअॅलिटी शोजमध्येही दिसली आणि तिने प्रेक्षकांना तिच्या विविध रंगांनी भारावून टाकले.
2019 मध्ये ‘डायन’ ही तिची शेवटची मालिका ठरली. त्यानंतर ती काही काळासाठी ‘किचन चॅम्पियन 5 ‘ मध्ये स्पर्धक म्हणून दिसली. मात्र 2021 मध्ये तिने ठाम निर्णय घेतला, अभिनय क्षेत्रातून बाजूला होऊन स्वतःचं व्यावसायिक स्वप्न पूर्ण करण्याचा. आणि ते स्वप्न होतं स्वतःचा मेकअप ब्रँड सुरू करण्याचं.
2018 मध्ये, अभिनय क्षेत्रातून बाहेर पडण्याच्या एक वर्ष आधी, आशकाने अहमदाबादमध्ये ‘रेनी कॉस्मेटिक्स’ या मेकअप ब्रँडची स्थापना केली. तिच्यासोबत या ब्रँडमध्ये प्रियांक शाह आणि आशुतोष वलानी हे सह-संस्थापक होते, जे ‘बियर्डो’ या पुरुषांसाठीच्या ग्रूमिंग ब्रँडमुळे आधीपासूनच प्रसिद्ध होते.
रेनी कॉस्मेटिक्स आणि आशकाची संपत्ती
रेनीने सुरुवातीला एक इंटरनेट ब्रँड म्हणून 50 लाख रुपयांच्या गुंतवणुकीसह सुरूवात केली होती. Amazon, Flipkart, Myntra, Nykaa अशा मोठ्या रिटेल प्लॅटफॉर्मद्वारे ब्रँडने ऑनलाइन विक्रीत लक्षणीय यश मिळवलं. इतकंच नव्हे तर 2024 पर्यंत, विविध फंडिंग राउंडमध्ये 100 कोटी रुपये उभारल्यानंतर, रेनी कॉस्मेटिक्सचं मार्केट व्हॅल्यू जवळपास 1,200 ते 1,400 कोटी रुपयांच्या घरात पोहोचलं. यामुळे आशकाच्या एकूण संपत्तीत जबरदस्त वाढ झाली आणि ती आज एक यशस्वी महिला उद्योजिका म्हणून ओळखली जाते.
व्यक्तिगत आयुष्यातही आशकाने मोठा बदल अनुभवला. 2017 मध्ये तिने अमेरिकन बॉयफ्रेंड ब्रेंट गोबलसोबत विवाह केला. 2019 मध्ये हे दांपत्य गोव्यात स्थलांतरित झालं, जिथे ब्रेंटने योगा शिकवण्यास सुरुवात केली. 2023 मध्ये त्यांना एक मुलगा झाला आणि आज हे कुटुंब गोव्यात शांत, समाधानी आयुष्य जगत आहे.