नुकत्याच एका आगळ्यावेगळ्या यादीने क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यादी आहे अशा खेळाडूंची, ज्यांची उंची क्रिकेटविश्वाच्या सरासरी मानकांपेक्षा खूपच कमी आहे. पण याचं वैशिष्ट्य म्हणजे उंची कमी असली तरीही त्यांनी आपल्या खेळाच्या जोरावर जगभरात नाव कमावलं. या यादीत दोन भारतीय खेळाडूंनाही स्थान मिळालं असून, त्यांनी हे सिद्ध केलं आहे की मैदानात यश मिळवण्यासाठी उंची नाही तर आत्मविश्वास आणि कौशल्य अधिक महत्त्वाचं असतं.

क्रिकेट हा खेळ जिथे बॉलच्या वेगावर आणि खेळाडूंच्या लांब पावलांवर भर दिला जातो, तिथे उंची कमी असणं ही अडचण वाटू शकते. पण काही खेळाडूंनी हीच कमतरता आपली ओळख बनवली आणि मैदानावर ती त्यांच्या शैलीचा भाग करून टाकली. त्यांच्या चपळ हालचाली, जलद प्रतिसाद आणि मैदानातली ती खास उर्जा यामुळे त्यांनी क्रिकेटप्रेमींच्या मनात कायमची जागा मिळवली आहे.
क्रिस हॅरेस आणि मुशफिकूर रहीम
या खास यादीत सर्वात कमी उंचीचा खेळाडू म्हणून पहीलं नाव येतं, क्रिस हॅरेस. न्यूझीलंडकडून खेळलेला हा अष्टपैलू खेळाडू केवळ 5 फूट 4 इंच उंच असून, त्याच्या खेळाने 1990 आणि 2000 च्या दशकात अनेक सामने गाजवले. त्याच्यानंतर बांगलादेशचा यष्टिरक्षक आणि आक्रमक फलंदाज मुशफिकूर रहीम, जो 5 फूट 3 इंच उंच आहे, त्याच्या नजाकतीने आणि आत्मविश्वासपूर्ण फलंदाजीने बांगलादेशला नवे बळ दिले.
सचिन तेंडुलकर आणि पार्थिव पटेल
या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचंही नाव येतं. 5 फूट 5 इंच उंच असलेला हा महान फलंदाज प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्थान आहे. उंची लहान असली तरी त्याच्या फलंदाजीच्या उंचीला गाठणं कठीणच आहे. दुसरा भारतीय खेळाडू म्हणजे पार्थिव पटेल. तोदेखील 5 फूट 4 इंच उंच असून त्याने भारतासाठी यष्टिरक्षक आणि सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी केली आहे.
टेम्बा बावुमा
या यादीत दक्षिण आफ्रिकेचा टेम्बा बावुमा देखील आहे, ज्याची उंची फक्त 5 फूट 3 इंच आहे. त्याने आपल्यातल्या कमतरतांवर मात करत आफ्रिकन संघाचं नेतृत्व केलं. अशा या खेळाडूंनी क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख तयार करत जगाला दाखवून दिलं की शरीराचं मोजमाप यशाचं प्रमाण असू शकत नाही. महत्त्वाचं असतं ते म्हणजे चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वास.