वॉशिंग मशीन निवडताना सिंगल टब घ्यावा की डबल टब हा प्रश्न प्रत्येक गृहिणीपासून ते पहिल्यांदा मशीन घेणाऱ्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांच्या मनात निर्माण होतो. कारण हे एकदाच होणारे गुंतवणुकीचे आणि दैनंदिन सोयीशी निगडित निर्णय असतो. त्यामुळे कोणता पर्याय आपल्या जीवनशैली, बजेट, वेळ आणि गरजेनुसार योग्य आहे हे नीट समजून घेतल्याशिवाय कोणतीही घाईची खरेदी नको.

आज वॉशिंग मशीनच्या बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत टॉप लोड, फ्रंट लोड, सेमी-ऑटोमॅटिक, फुली ऑटोमॅटिक पण त्यामध्ये सिंगल टब आणि डबल टब हे दोन मूलभूत प्रकार सर्वाधिक चर्चेत असतात. एका टबमध्ये कपडे धुणे आणि वाळवणे हे सर्व काही एकाच ठिकाणी होते, तर डबल टबमध्ये हे दोन टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या टबमध्ये करावे लागते.
सिंगल टब मशीन
सिंगल टब मशीन पूर्णपणे स्वयंचलित असतात. तुम्ही कपडे आणि डिटर्जंट टाकून एक बटण दाबा, बाकी सगळं काम मशीन करते. धुणे, पाणी टाकणे, वाळवणे सगळं एकाच ठिकाणी आणि तुमचा वेळही वाचतो. ही सोय विशेषतः शहरांमध्ये राहणाऱ्यांसाठी किंवा कामावर जाणाऱ्या व्यक्तींसाठी आदर्श आहे. शिवाय, या प्रकारांमध्ये कपड्यांच्या प्रकारानुसार वेगवेगळे वॉश मोड्स दिलेले असतात, जे नाजूक कपड्यांपासून ते कठीण डागांपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी उपयुक्त ठरतात.
डबल टब सेमी-ऑटोमॅटिक मशीन
दुसरीकडे, डबल टब असलेली सेमी-ऑटोमॅटिक मशीन थोडी श्रमाची गरज भासवणारी असते. एक टबमध्ये कपडे धुतल्यावर ते दुसऱ्या टबमध्ये वाळवण्यासाठी हलवावे लागते. त्यामुळे यासाठी थोडा वेळ आणि उपस्थिती आवश्यक असते. पण या मशीनचे फायदेही आहेत. हे मशीन कमी वीज वापरते, त्याची देखभाल सोपी असते आणि त्याचा दुरुस्ती खर्चही तुलनेत कमी असतो. शिवाय ग्रामीण भागात किंवा जिथे सतत वीज पुरवठा नसतो, अशा ठिकाणी डबल टब मशीन अधिक योग्य ठरते.
पाणी आणि वीज
पाणी आणि वीज याचा विचार केला तर पूर्ण-स्वयंचलित फ्रंट-लोड मशीन्स पाण्याच्या बाबतीत अधिक किफायतशीर असतात. त्या तुलनेत सेमी-ऑटोमॅटिक मशीन्समध्ये जास्त पाणी लागते कारण हाताने प्रत्येक सायकलनंतर स्वच्छ पाणी टाकावे लागते. मात्र यामध्ये वीज वापर कमी होतो.
बजेटमधील फरक
बजेटच्या बाबतीत बोलायचं झालं, तर अर्ध-स्वयंचलित डबल टब मशीन्स 10,000 ते 15,000 रुपयांदरम्यान मिळतात. हे बजेट फ्रेंडली पर्याय आहेत. त्याचवेळी पूर्ण-स्वयंचलित सिंगल टब मशीन्स, विशेषतः फ्रंट लोड प्रकार, 20,000 पासून सुरू होतात आणि 40,000 पर्यंत किंवा त्याही पुढे जातात.
कोणता पर्याय निवडाल?
अशा सगळ्या बाबी विचारात घेतल्या तर तुमची जीवनशैली आणि वापराची सवय हाच सर्वात मोठा निर्णायक मुद्दा ठरतो. वेळ कमी असेल, सोय हवी असेल, आणि बजेट थोडं मोठं असेल तर सिंगल टब फुल-ऑटोमॅटिक मशीन योग्य आहे. परंतु बजेट थोडं मर्यादित असेल, हातचं थोडं काम करण्याची तयारी असेल, आणि टिकाऊ, दुरुस्त करायला सोपं मशीन हवं असेल, तर डबल टब सेमी-ऑटोमॅटिक मशीन अधिक चांगला पर्याय ठरेल.