भारतात अनेक समुदायांनी आपल्या कष्ट, हुशारी आणि धाडसाच्या जोरावर यशाचे शिखर गाठले. त्यात मुस्लिम उद्योजकांचं योगदान विशेष लक्षवेधी आहे. आज आपण अशाच पाच मुस्लिम कुटुंबांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कामगिरीने नाव कमावलं. काहींनी आयटी, काहींनी हेल्थकेअर, तर काहींनी बूट विकून अब्जावधींचा व्यवसाय उभारला. त्यांच्या यशामागे आहे कठोर मेहनत, दूरदृष्टी आणि समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची नितांत इच्छाशक्ती.
अझीम प्रेमजी

या यादीत सर्वप्रथम नाव येतं अझीम प्रेमजी यांचं. एक शांत, अभ्यासू आणि अत्यंत उदार व्यक्तिमत्त्व. विप्रो या आयटी कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष असलेल्या प्रेमजींची संपत्ती जवळपास ₹1 लाख कोटींच्या घरात आहे.
पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सामाजिक जबाबदारीची जाण ठेवत आतापर्यंत ₹9,713 कोटींची देणगी दिली आहे. एका अहवालानुसार ते दररोज सरासरी ₹27 कोटींचं दान करतात, जे त्यांना भारतातील सर्वात मोठ्या दात्यांपैकी एक ठरवतं. यशाबरोबर समाजासाठीही मोठ्या मनाने काहीतरी देण्याची त्यांची वृत्ती प्रेरणादायी आहे.
एम.ए. युसुफ अली
केरळमधून आपल्या प्रवासाची सुरुवात करणारे आणि आता अबू धाबीमध्ये स्थायिक झालेले एम.ए. युसुफ अली हे लुलू ग्रुप इंटरनॅशनलचे संस्थापक आहेत. त्यांच्या मालकीतील हायपरमार्केट्स आणि मॉल्स केवळ मध्य पूर्वेतच नव्हे, तर भारतातही मोठ्या प्रमाणात विस्तारले आहेत. ₹65,150 कोटींपेक्षा अधिक मालमत्तेसह ते एका खऱ्या आंतरराष्ट्रीय व्यावसायिकाचे उदाहरण आहेत. त्यांनी विशेषतः भारतात रोजगारनिर्मितीला चालना दिली असून लुलू मॉल्समुळे हजारो लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.
युसुफ हमीद
मुंबईस्थित सिप्ला कंपनीचे प्रमुख युसुफ हमीद हे केवळ उद्योगपती नाहीत, तर एक संवेदनशील शास्त्रज्ञदेखील आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे एचआयव्हीसारख्या गंभीर आजारांवर परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध झाली आणि लाखो लोकांचे प्राण वाचले. त्यांची अंदाजे मालमत्ता ₹21,000 कोटी असून त्यांना 2005 मध्ये भारत सरकारने ‘पद्मभूषण’ने गौरवले.
रफिक मलिक
फुटवेअर व्यवसायात नाव कमावलेलं एक दमदार उदाहरण म्हणजे रफिक मलिक. मेट्रो ब्रँड्स लिमिटेडचे ते अध्यक्ष आहेत. ‘मेट्रो’, ‘मोची’, ‘वॉकवे’ यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्स त्यांच्या छत्राखाली आहेत. त्यांच्या व्यवसायाची एकूण किंमत सुमारे ₹17,160 कोटींच्या आसपास आहे. रस्त्यावर बूट विकणं हे काम त्यांनी आज एका अब्जावधींच्या रिटेल साम्राज्यात रूपांतरित केलं आहे, हेच त्यांचं खऱ्या अर्थाने यश दर्शवतं.
डॉ. आझाद मूपेन
आणि शेवटी, डॉक्टर ते उद्योगपती असा प्रवास करणाऱ्या डॉ. आझाद मूपेन यांचं नावही यादीत आहे. केरळमध्ये जन्मलेले आणि नंतर दुबईत स्थायिक झालेले मूपेन यांनी एस्टर डीएम हेल्थकेअर नावाची कंपनी उभारली, जी आज आंतरराष्ट्रीय पातळीवर एक नामवंत हेल्थकेअर ब्रँड बनली आहे. त्यांची मालमत्ता ₹8,300 कोटींपेक्षा जास्त आहे. डॉक्टर असताना सुरुवात करून, एक यशस्वी उद्योग उभारणं हे त्यांच्या दूरदृष्टीचं आणि सेवाभावी वृत्तीचं मोठं उदाहरण आहे