क्रिकेटमध्ये जेव्हा विक्रमांची गोष्ट निघते, तेव्हा काही खेळाडू अशा पद्धतीने लक्षात राहतात की त्यांची कामगिरी इतिहासात कोरली जाते. असाच एक खेळाडू म्हणजे “युनिव्हर्स बॉस” म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेल. जगभरात त्याच्या फटकेबाजीची दहशत आहे, पण एका अशा विक्रमाचा तो आजही एकमेव मालक आहे, जो फक्त त्यानेच केला आणि आजपर्यंत कोणीही त्याच्या जवळपासही पोहोचू शकलेलं नाही.

कसोटीच्या पहिल्या बॉलवर सिक्स
वर्ष होतं 2012 आणि सामना होता बांगलादेशविरुद्ध. त्या दिवशी मिरपूरच्या मैदानावर जे घडलं, ते आजही चाहत्यांच्या आठवणीत ताजं आहे. क्रिस गेलने कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. कसोटी क्रिकेटसारख्या संयमाच्या खेळाच्या फॉरमॅटमध्ये अशी धाडसी कृती करणारा तो एकमेव फलंदाज ठरला. आणि गंमत म्हणजे त्याचा तो षटकार बांगलादेशसाठी पदार्पण करणाऱ्या फिरकीपटू सोहाग गाजीच्या गोलंदाजीवर होता. बांगलादेशचा कर्णधार मुशफिकुर रहीमने गाजीकडून इनिंगची सुरुवात करून काही वेगळं करण्याचा विचार केला असेल, पण गेलने त्याला त्याच्या पहिल्याच चेंडूवर हवेत उडवून दिलं.
हा पराक्रम आजही अभेद्य आहे. 13 वर्षांनंतरही, कसोटीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचं धाडस पुन्हा कोणीही केलं नाही. कारण कसोटी क्रिकेट म्हणजे संयम, सावधगिरी आणि स्ट्रॅटेजीचा खेळ. आणि त्यात गेलसारखा खेळाडू येतो आणि पहिल्याच चेंडूवर षटकार मारतो, तर तो इतिहासात वेगळ्या उंचीवर पोहोचतो.
क्रिस गेलचे रेकॉर्ड्स
क्रिस गेलचे रेकॉर्ड्स इतक्यावरच संपत नाहीत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने एकूण 553 षटकार ठोकले आहेत, ज्याने तो या यादीत रोहित शर्मानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. कसोटीतसुद्धा त्याचं वर्चस्व आहे, त्याने 98 षटकार मारले असून, तो कसोटीमधील टॉप 5 सिक्सर हिटरमध्ये गणला जातो.
पण त्याचा आणखी एक विक्रम अजून जास्त विलक्षण आहे, तो जगातील एकमेव फलंदाज आहे ज्याच्या खात्यात कसोटीत त्रिशतक, वनडेमध्ये द्विशतक आणि T20 मध्ये शतक आहे. असा त्रिसंधीचा इतिहास अजून कोणी घडवलेला नाही.