फ्रान्समध्ये परदेशात घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक रोमांचक संधी चालून आली आहे. मध्य फ्रान्समधील अम्बर्ट (Ambert) या ऐतिहासिक आणि निसर्गरम्य शहराने एक अनोखी योजना आणली आहे, ज्यामध्ये तुम्ही अवघ्या 1 युरोमध्ये म्हणजेच सुमारे 100 रुपयांत घर घेऊ शकता. ही योजना केवळ फ्रेंच नागरिकांसाठी नाही, तर भारतासह जगभरातील इच्छुक व्यक्तींनाही लागू आहे. मात्र, या संधीमागे काही सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे आहेत आणि त्यासाठी काही अटी स्वीकाराव्या लागतील.

अम्बर्ट शहर
अम्बर्ट हे मध्य फ्रान्समधील पुय-दे-डोम भागात वसलेलं शहर आहे. येथे सध्या सुमारे 6,500 लोक राहतात, पण गेल्या काही वर्षांत अनेक नागरिकांनी हे ठिकाण सोडलं आहे. परिणामी, शहरातील सुमारे 60% घरे रिकामी पडली आहेत. त्यामुळे प्रशासनाने 5 वर्षांची एक योजना आणली आहे, ज्यात ते नव्या रहिवाशांना आकर्षित करण्यासाठी घरं अवघ्या 1 युरोमध्ये देत आहेत.
मात्र, ही घरे ताबडतोब वापरायच्या स्थितीत नाहीत. फोर्ब्सच्या अहवालानुसार, यातील अनेक घरांची स्थिती खराब आहे आणि त्यांना पूर्ण नूतनीकरणाची गरज आहे. हे नूतनीकरण करण्यासाठी तुम्हाला सुमारे 20,000 ते 50,000 युरो म्हणजेच 18 ते 45 लाख रुपये खर्च करावे लागू शकतात. ही रक्कम ऐकून घाबरू नका, कारण प्रशासन घर खरेदीदारांना कमी व्याज दरावर कर्ज आणि अनुदान देऊन मदत करत आहे.
अर्ज आणि अटी
या योजनेचा मुख्य हेतू लोकांना फक्त गुंतवणुकीसाठी नाही, तर प्रत्यक्ष राहण्यासाठी इथे आणणं आहे. म्हणूनच, तुम्हाला त्या घरात किमान 3 वर्षे राहणं बंधनकारक आहे. विशेष म्हणजे, या योजनेत भारतीय नागरिकही अर्ज करू शकतात. फ्रेंच भाषा जाणणं आवश्यक नसलं, तरी संवादासाठी ती उपयोगी ठरू शकते. अर्ज अम्बर्टच्या टाऊन हॉलमध्ये करता येतो.
या संधीमुळे शहरात आधीच काही सकारात्मक बदल घडायला सुरुवात झाली आहे. काही शाळांमध्ये मुलांची संख्या वाढली आहे, आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही थोडा जीव आला आहे. अम्बर्ट हे शहर मध्ययुगीन वास्तुकला, नैसर्गिक सौंदर्य आणि परंपरागत वस्तू बनवण्याच्या कलेसाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला गजबजाटापासून दूर जाऊन एका समुदायाचा भाग व्हायचं असेल, तर अम्बर्ट हे ठिकाण तुमचं स्वप्न साकार करू शकतं.