जगात अशी अनेक विलक्षण ठिकाणं आहेत जिथे निसर्गाच्या अद्भुत करामती माणसाला अचंबित करतात. भारतात जिथे संध्याकाळ झाली की काळोख हळूहळू पसरायला लागतो, तिथेच पृथ्वीवरील काही भागांमध्ये अशी वेळही येते जेव्हा दिवस कधीच संपत नाही. काही देशांमध्ये मध्यरात्रीही सूर्य आपला तेजस्वी प्रकाश पसरवत राहतो, जणू निसर्ग स्वतः एक वेगळा नियम रचतो. या अद्भुत दृश्याचा अनुभव घेणं हे एका स्वप्नासारखं असतं. ना काळोख, ना रात्रीची शांतता केवळ सतत चालणारा दिवस.


या नैसर्गिक घटनेला “मिडनाइट सन” असं म्हटलं जातं. पृथ्वीच्या अक्षांशांमुळे आणि भूमितीय स्थितीमुळे काही देशांमध्ये उन्हाळ्याच्या विशिष्ट कालावधीत सूर्य संपूर्ण दिवस आणि रात्र मावळतच नाही. यामुळे संपूर्ण जग अंधारात असताना या देशांमध्ये प्रकाशमान दिवस सुरूच राहतो.
नॉर्वे

नॉर्वे हे त्याचं प्रमुख उदाहरण आहे. ‘मिडनाईट सन’साठी प्रसिद्ध असलेल्या या देशात मे ते जुलैदरम्यान सुमारे 76 दिवस सूर्य मावळत नाही. विशेषतः स्वालबार्ड हे ठिकाण तर यामध्ये सर्वात आगळंवेगळं आहे. इथे फक्त 40 मिनिटांसाठी रात्र होते, बाकी सगळा वेळ दिवसाचाच अनुभव येतो. त्यामुळे इथले लोक रात्री बाहेर हिंडताना, समुद्रकिनाऱ्यावर खेळताना, अगदी बाहेर बसून कॉफी पीताना दिसतात.
स्वीडन

स्वीडनमधील किरुना आणि अबिस्कोसारख्या ठिकाणी तर जवळपास 100 दिवस सूर्य मावळत नाही. स्थानिक लोक याला आनंदाचा काळ मानतात. उन्हाळ्यात विविध पारंपरिक उत्सव साजरे होतात. सततचा प्रकाश या सणांना आणखी जिवंतपणा देतो.
फिनलंड

फिनलंडही यामध्ये मागे नाही. इथेही मे ते जुलैदरम्यान सुमारे 73 दिवस दिवस सुरूच असतो. पण यामुळे लोकांमध्ये झोपेच्या समस्या उद्भवतात. म्हणूनच येथे ब्लॅकआउट पडदे खूप सामान्य आहेत, जे घराच्या खोलीत रात्रीसारखं वातावरण तयार करतात.
आइसलँड

आइसलँड, जे युरोपमधील दुसरं सर्वात मोठं बेट मानलं जातं, तिथे 10 मेपासून जुलैपर्यंत सूर्य मावळत नाही. रात्रीही प्रकाशमान वातावरणामुळे, पर्यटकांची गर्दीही इथे वाढते. ग्रीनलँडमधील परिस्थितीही अशीच आहे, उन्हाळ्यात तिथेही सतत सूर्यप्रकाश पाहायला मिळतो.
कॅनडा

कॅनडामधील नुनावुत प्रांतात उन्हाळ्याच्या काळात सुमारे 50 दिवस सूर्य मावळत नाही. आणि अमेरिकेच्या अलास्का राज्यात तर मे ते जुलैदरम्यान 60 ते 70 दिवस रात्रच होत नाही. अशा काळात तिथलं आकाश नेहमी उजळलेलं असतं, जे पाहणं म्हणजे एका जादूई अनुभवासारखं वाटतं.
अशा ठिकाणी राहणं किंवा तिथे प्रवास करणं म्हणजे एका वेगळ्याच जगात पाऊल ठेवण्यासारखं आहे. सूर्यप्रकाशाच्या सतत उपस्थितीमुळे इथल्या लोकांची जीवनशैली, त्यांचे सण, त्यांचे आरोग्य आणि त्यांचा दिवस घालवण्याची पद्धत सुद्धा आपल्या कल्पनांपेक्षा वेगळी असते.













