भारतातील जवळपास प्रत्येक रेल्वे प्लॅटफॉर्मवर पिवळसर रंगाचा फलक… आणि त्यावर मोठ्या काळ्या अक्षरांत त्या स्थानकाचं नाव लिहिलेलं असतं. पण कधी विचार केलाय का, की ही सगळी नावं नेमकी पिवळ्या रंगाच्या फलकावरच का असतात? यामागे काय कारण असेल बरं? या प्रश्नाचं उत्तर आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

भारतीय रेल्वेचं नेटवर्क हे जगातलं सर्वात मोठ्या रेल्वे व्यवस्थांपैकी एक आहे आणि इतक्या विस्तृत व्यवस्थेत प्रत्येक तपशिलामागे काही ना काही अर्थ नक्कीच असतो. याचाच एक भाग म्हणजे स्थानकांची नावे दाखवणारे हे पिवळे फलक. काही लोकांना वाटतं की हे डिझाइन फक्त सौंदर्यदृष्टिकोनातून तयार केलं गेलंय, पण खरं सांगायचं झालं तर यामागे आहे अत्यंत सोप्पं आणि वापरात येणारं विज्ञान.
पिवळ्या रंगाचे बोर्ड आणि त्यामागील कारण
पिवळा रंग हा मानवी डोळ्याला लांबूनही लगेच दिसणारा रंग आहे. विशेषतः प्रकाश जास्त असला, अथवा संध्याकाळचा अंधूक प्रकाश असला तरी पिवळा रंग नजर वेधून घेतो. त्यामुळे रेल्वे स्टेशन जवळ येत असताना ट्रेन चालवत असलेला लोको पायलट लांबूनच या बोर्डकडे लक्ष देतो आणि स्टेशन जवळ आल्याची माहिती आधीच मिळते. त्यामुळे जर त्या स्थानकावर गाडी थांबायची असेल, तर योग्य वेळी ब्रेक लावणे शक्य होतं, आणि जर थांबायचं नसेल तर हॉर्न वाजवून लोकांना सावध करण्यासाठी पायलट सज्ज होतो.
आता प्रश्न येतो, की पिवळ्या बोर्डावर नावं नेमकी काळ्याच रंगात का लिहिली जातात? याचं कारणही तितकंच रोचक आहे. काळा रंग आणि पिवळा रंग यांच्यात खूप तीव्र कॉन्ट्रास्ट असतो, त्यामुळे अगदी कमी प्रकाशातसुद्धा ही अक्षरं स्पष्टपणे दिसतात. काळ्या रंगाने लिहिलेली माहिती पिवळ्या पार्श्वभूमीवर इतकी उठून दिसते, की ट्रेनच्या वेगातसुद्धा वाचणं सहज शक्य होतं. विशेषतः ग्रामीण भागात किंवा लहान स्टेशनांवर याचा खूप मोठा उपयोग होतो.
प्रवाशांसाठीही होतो मोठा फायदा
हे फलक फक्त लोको पायलटसाठी नाहीत, तर प्रवाशांसाठीदेखील एक मार्गदर्शक भूमिका बजावतात. अनेकदा ट्रेनमधून प्रवास करताना बाहेर नजरेने शोध घेतल्यावर डोळ्यासमोर पिवळा फलक लगेच चमकतो, जो सांगतो की तुम्ही कोणत्या स्थानकावर आहात किंवा पुढचं स्टेशन कोणतं येणार आहे.
कधीकधी आपण इतक्या छोट्या गोष्टींना दुर्लक्ष करतो, पण त्यामागे असलेली विचारशक्ती आणि उपयोगिता समजून घेतली, की भारतीय रेल्वेसारखी मोठी संस्था किती काटेकोर आणि परिणामकारक पद्धतीने काम करते याची जाणीव होते.