श्रावण महिना आला की शिवभक्तांच्या मनात एक वेगळीच भक्तिभावना जागृत होते. हा महिना म्हणजे केवळ उपासना नव्हे, तर आंतरिक श्रद्धेचा महोत्सव असतो. भारतभरातील शिवमंदिरं फुलून जातात, पण यंदा उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या एका विस्मृतीत गेलेल्या शिवमंदिराने देशभरात लक्ष वेधून घेतलं. कारण, या मंदिरात 300 वर्षांनंतर नुसती पूजा नाही, तर थेट 23 लाखांच्या सोन्याच्या भांड्यांनी भगवान शिवाचा जलाभिषेक करण्यात आला.

गोटेश्वर महादेव मंदिर
मराठा साम्राज्याच्या काळात बांधले गेलेले हे मंदिर कोणत्याही आधुनिक देखभालीशिवाय वर्षानुवर्षे ओसाड अवस्थेत होते. मुस्लिमबहुल भागात असल्यामुळे धार्मिक कार्यक्रमांना मर्यादा आल्या आणि मंदिराचा रस्ता देखील बंद करण्यात आला. त्यामुळे येथे येणं केवळ अशक्यच नव्हे, तर धोकादायकही वाटत होतं. भाविकांच्या पायांचे वळण वर्षानुवर्षे या प्राचीन मंदिरापासून दूर गेले.
पण 2020 मध्ये परिस्थितीला कलाटणी मिळाली. जिल्हाधिकारी अखिलेश सिंह यांच्या पुढाकाराने आणि काही हिंदू संघटनांच्या प्रयत्नांमुळे बंद दरवाजे पुन्हा उघडले गेले. मंदिरात पुन्हा घंटानाद झाला. प्रशासनाने मंदिराच्या देखभालीची जबाबदारी स्थानिक व्यापाऱ्यांवर सोपवली आणि त्यातूनच मंदिर समितीची स्थापना झाली. हे मंदिर आता केवळ एक धार्मिक स्थळ राहिले नाही, तर भक्तीभाव आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाचे प्रतीक ठरले आहे.
250 सोन्याच्या भांड्यांनी जलाभिषेक
समितीचे सरचिटणीस अमित पंडित यांनी 2021 पासून मंदिरात नियमित पूजा आणि उत्सवांच्या परंपरा पुन्हा सुरू केल्या. श्रावण महिना, शिवरात्रीसारखे सण याठिकाणी आता मोठ्या श्रद्धेने साजरे होतात. मंदिर परिसरात असलेली जुनी विहीर, त्याची स्थापत्य रचना, आणि भिंतींवर कोरलेली कलाकुसर मराठा काळातील इतिहासाची साक्ष देतात.
याच समितीने यंदा श्रावणमध्ये एक ऐतिहासिक पाऊल उचललं. भगवान शिवाचा जलाभिषेक तब्बल 250 सोन्याच्या 24 कॅरेट भांड्यांनी करण्यात आला. 23 लाख रुपयांची ही श्रद्धा केवळ भक्ती नव्हे, तर शतकानुशतकांची परंपरा आणि प्रेम व्यक्त करणारी कृती होती. हे दृश्य पाहून कोणाचंही मन भारावून जाईल. हे मंदिर म्हणजे काळाच्या पडद्याआड हरवलेली एक श्रद्धेची ज्योत, जी पुन्हा एकदा उजळून निघाली आहे.