जगभरात इस्लाम धर्माचे अनुयायी वाढत असताना, मुस्लिम देशही विविध पातळ्यांवर प्रगती करत आहेत. काही देश अजूनही दारिद्र्याशी झुंज देत असताना, काही मुस्लिम राष्ट्रांनी अफाट संपत्ती मिळवत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले स्थान मजबूत केले आहे. त्यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारताचा एक खास मित्र देश जगातील सर्वात श्रीमंत मुस्लिम देश बनला आहे.
कतार टॉपवर

जगातील सर्वात श्रीमंत मुस्लिम देश म्हणून कतारने बाजी मारली आहे. फारशी मोठी लोकसंख्या नसतानाही, या देशाने नैसर्गिक संसाधनांवर आधारित उत्पन्नाच्या जोरावर जागतिक अर्थकारणात आपला ठसा उमटवला आहे. केवळ 1.7 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या कतारने प्रचंड प्रमाणावर नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाची निर्यात करून आपली अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. 2011 मध्ये कतारचे दरडोई उत्पन्न सुमारे 88,919 अमेरिकी डॉलर इतके होते, जे त्या काळात अनेक प्रगत देशांपेक्षाही अधिक होते.
कुवेत
कतारनंतर यादीत कुवेतचा क्रमांक लागतो. सुमारे 3.5 दशलक्ष लोकसंख्या असलेला हा देशही मुख्यतः तेलावर आधारित अर्थव्यवस्था चालवतो. 2011 मध्ये त्याचा दरडोई जीडीपी 54,664 अमेरिकी डॉलर होता. कुवेतच्या प्रगतीत शिपिंग उद्योगाचाही मोठा वाटा असून, आखाती भागातील त्याचे भौगोलिक स्थानही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
ब्रुनेई
तिसऱ्या क्रमांकावर ब्रुनेई या छोट्याशा पण अतिशय संपन्न देशाचे नाव येते. 2010 मध्ये ब्रुनेईचा दरडोई जीडीपी सुमारे 50,506 डॉलर इतका होता. गेली अनेक दशके तेल आणि वायू यावर आधारित अर्थव्यवस्थेने या देशाला आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम बनवले आहे. आज ब्रुनेई जगातील नववा सर्वात मोठा नैसर्गिक वायू निर्यातदार आणि चौथा सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे.
संयुक्त अरब अमिराती
या तिघांव्यतिरिक्त, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि ओमान या देशांनीही यादीत स्थान मिळवलं आहे. युएईमध्ये मोठ्या प्रमाणावर तेल आणि वायू उपलब्ध असून, पर्यटन, व्यापार आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या जोरावर त्यांची अर्थव्यवस्था अधिक व्यापक बनली आहे. ओमानमध्ये सुमारे 849.5 अब्ज घनमीटर नैसर्गिक वायूचे साठे असून, त्याशिवाय मौल्यवान खनिज संसाधनांनीही त्याच्या संपत्तीला हातभार लावला आहे.
सौदी अरेबिया
सौदी अरेबिया, ज्याला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल उत्पादक देश मानले जाते, तो सहाव्या स्थानावर आहे. त्यानंतर बहरीन सातव्या क्रमांकावर असून, त्याची समृद्धी देखील पेट्रोलियम उद्योगावर अवलंबून आहे.
मात्र, या सर्व देशांमध्ये पाकिस्तानचे नाव कुठेही आढळत नाही. एकेकाळी इस्लामी जगतात विशेष स्थान असलेला पाकिस्तान, आज गंभीर आर्थिक संकटांशी झुंज देतो आहे. आर्थिक अस्थिरता, परकीय कर्जाचा भार आणि संसाधन व्यवस्थापनातील कमतरता यामुळे पाकिस्तान या श्रीमंत देशांच्या यादीपासून दूर राहिला आहे.