जगातील सर्वात व्यस्त विमानतळांची यादी आली, भारताचे IGI विमानतळ आता टॉप-10 मध्ये! पहिल्या क्रमांकावर कोणता देश?

Published on -

जगभरात विमान प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीतले आकडेही नवे उच्चांक गाठू लागले आहेत. कोविडच्या सावल्या मागे टाकत जग पुन्हा एकदा आकाशात भरारी घेऊ लागले आहे आणि याच काळात भारताने एक अभिमानास्पद झेप घेतली आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, म्हणजेच दिल्लीचं आयजीआयए, 2024 च्या जगातील सर्वात व्यस्त विमानतळांच्या यादीत नवव्या क्रमांकावर पोहोचलं आहे.

अटलांटा पहिल्या नंबरवर

एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल (ACI) ने नुकताच 2024 चा अहवाल प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये जगभरातील एकूण प्रवासी वाहतुकीच्या आकडेवारीवरून ही यादी तयार करण्यात आली. या यादीत सर्वाधिक प्रवासी हालचाल झाली ती अमेरिकेतील अटलांटाच्या हार्ट्सफील्ड-जॅक्सन विमानतळावर. तब्बल 10.80 कोटी प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केला. 1998 पासून सतत अग्रस्थानी असणाऱ्या या विमानतळाने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे.

दुसऱ्या क्रमांकावर आले आहे दुबई इंटरनॅशनल विमानतळ, ज्याने 92 दशलक्षहून अधिक प्रवाशांना हाताळलं. त्यानंतर डॅलस/फोर्ट वर्थ, टोकियो हानेडा आणि लंडन हीथ्रो अशा जागतिक दर्जाच्या विमानतळांनी अनुक्रमे तिसरे, चौथे आणि पाचवे स्थान घेतले. डेन्व्हर, इस्तंबूल, ग्वांगझू बाययुन आणि लॉस एंजेलिस हे क्रमशः पुढील चार स्थानांवर आहेत.

भारत टॉप-10 मध्ये सामील

या क्रमवारीत भारताचा प्रतिनिधी म्हणून दिल्लीच्या आयजीआयए विमानतळाने झेप घेतली आणि 77.8 दशलक्ष प्रवाशांना सेवा देत नववे स्थान मिळवलं. विशेष म्हणजे 2021 मध्ये हेच विमानतळ 13 व्या क्रमांकावर होतं आणि 2023 मध्ये दहावं. म्हणजेच, सातत्याने वर जात आयजीआयए आता टॉप 10 च्या यादीत स्थिरावलाय. ही घोडदौड सहज शक्य झालेली नाही. मागील काही वर्षांत दिल्ली विमानतळाने आपल्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या आहेत. नवीन उड्डाणसेवा सुरू झाल्या, जागतिक शहरांशी थेट संपर्क वाढवला गेला आणि संपूर्ण नेटवर्क विस्तारले गेले.

कोविडनंतर जगभरात प्रवासाचे प्रमाण पुन्हा झपाट्याने वाढू लागले. 2024 मध्ये एकूण प्रवासी वाहतूक 9.5 अब्जच्या पुढे गेली, जी 2019 च्या पूर्व-संकटकाळाच्या आकड्यांनाही मागे टाकणारी आहे. अटलांटाने पुन्हा आघाडी घेतली खरी, पण दुबई, टोकियो, डॅलससारखे विमानतळही आक्रमकतेने पुढे येत आहेत. आणि या स्पर्धेत भारताचा दिल्ली विमानतळही आता ताकदीने उभा आहे.

ही केवळ एक आकडेवारी नाही, तर भारताच्या जागतिक दर्जाच्या सेवा, व्यवस्थापन क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान यांचं प्रतिक आहे. टर्मिनल्सचा विस्तार, प्रवाशांसाठीच्या सुविधा, सुरक्षा यंत्रणा, तसेच पर्यावरणस्नेही उपाययोजना यामुळे आयजीआयए आज जागतिक व्यासपीठावर उठून दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!