आपल्या जीवनाच्या वाटचालीत आपल्याला अनेकदा असे लोक भेटतात, जे स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठी सतत काहीतरी चांगलं घडवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या आजूबाजूच्यांच्या आयुष्यात ते एक प्रकारचं भाग्य घेऊन येतात. असे लोक सहज विसरले जात नाहीत, कारण त्यांच्या वागणुकीत एक प्रामाणिकपणा, स्थैर्य आणि जबाबदारीची भावना असते.

अंकशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर यामागे त्यांचा जन्मतारीखेचा प्रभावही असतो. विशेषतः ज्यांचा जन्म 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला आहे, ते लोक ‘अंक 4’ चे प्रतिनिधी मानले जातात आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व खूपच विशेष असतं.
‘अंक 4’
अंक 4 असलेले लोक वास्तववादी दृष्टिकोन ठेवतात. स्वप्नं पाहणं त्यांना आवडतं, पण ते स्वप्नांच्या मागे धावणारे नसून, त्यात वास्तवाचा पाया बांधणारे असतात. जीवनाकडे त्यांचा दृष्टिकोन हा अत्यंत व्यावहारिक असतो. त्यामुळेच ते जे काही ठरवतात, त्यामागे विचारांची स्पष्टता आणि कृतीची निश्चितता असते. कोणतंही काम असो, ते संपूर्ण निष्ठेने आणि शिस्तीत पार पाडतात. वेळेचं नियोजन, कामाची बांधिलकी आणि जबाबदारीचं भान यामुळे ते इतरांमध्ये वेगळं स्थान निर्माण करतात.
त्यांच्या आयुष्याचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं स्थैर्य. वचनबद्धता ही त्यांच्या स्वभावाची ओळख असते. एकदा दिलेला शब्द ते कोणत्याही परिस्थितीत पाळतात. त्यामुळेच त्यांच्या नातेसंबंधांमध्ये विश्वासाचा पाया मजबूत असतो. मित्रमंडळी, कुटुंब आणि सहकारी यांच्यासाठी ते नेहमीच एक आधारस्तंभ ठरतात.
प्रेमात असतात अत्यंत प्रामाणिक
अशा व्यक्तींची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ते उत्तम भागीदार सिद्ध होतात. नात्यांमध्ये ते फक्त प्रेमच देत नाहीत, तर प्रत्येक पावलावर आपल्या जोडीदाराच्या पाठीशी उभे राहतात. त्यांच्या सहवासात सुरक्षा, विश्वास आणि भावनिक स्थिरता यांचा भक्कम अनुभव मिळतो. अनेकदा आपण म्हणतो की ‘हा माणूस माझ्या आयुष्यात आला म्हणूनच मी सावरलो’ हे वाक्य अनेकांच्या बाबतीत अंक 4 असलेल्या व्यक्तींच्या नावानेच लागू होतं.