जगात चहाचे असंख्य प्रकार आहेत. भारतात तर चहा म्हणजे जणू पहिलं प्रेमच. भारतात चहा बनवण्याची पद्धत देखील वेगवेगळी दिसून येते. पण, जगात एक चहा असा देखील आहे ज्याची किंमत हजारो किंवा लाखो नाही तर तब्बल कोटींमध्ये जाते. ऐकून विश्वास बसणार नही, पण हे सत्य आहे आणि या चहाचं नाव आहे दा होंग पाओ.

‘दा होंग पाओ’ चहा
चहासाठी प्रसिद्ध असलेल्या चीनमध्ये फुजियान प्रांतातील वुई पर्वतरांगांमध्ये हा दुर्मीळ चहा पिकतो. ‘दा होंग पाओ’ मागेही एक कथा आहे, की प्राचीन काळात एका रुग्ण सम्राटाने या चहामुळे आरोग्य पुन्हा मिळवलं आणि त्याच्या झुडुपांना लाल वस्त्राने झाकलं गेलं तेव्हापासून या चहाचं नाव आणि महत्त्व दोन्ही वाढलं.
हा चहा केवळ महागडाच नाही, तर फारच दुर्मिळही आहे. कारण याला बनवणाऱ्या झुडुपांची संख्या फारच कमी आहे. आणि विशेष म्हणजे, चीन सरकारने या झाडांना संरक्षित म्हणून घोषित केलं आहे. त्यामुळे या चहाची पाने मिळवणं म्हणजे अगदीच भाग्याची गोष्ट.
दा होंग पाओ चहाची वैशिष्ट्ये
दा होंग पाओ चहा इतका अनमोल का आहे, तर त्यामागे अनेक कारणं आहेत. एक म्हणजे त्याची पारंपरिक पद्धतीने होणारी प्रक्रिया ज्यामध्ये पाने कोरड्या हवेत, विशिष्ट प्रकारच्या उष्णतेखाली हळूहळू सुकवली जातात. त्याच्या प्रत्येक घोटात एक वेगळी उर्जा, एक अद्वितीय चव आणि खोलवर जाणारा सुगंध असतो. त्यात नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स, तणाव कमी करणारे गुण आणि शरीराला उर्जा देणारे घटक असल्यामुळे तो चहा आरोग्यवर्धक देखील मानला जातो.
किंमत किती?
आजही या चहाचा नमुना जर तुम्हाला मिळाला, तर त्याची किंमत कोटींच्या घरात जाते. 1 किलो दा होंग पाओ चहा जर लिलावात विकला गेला, तर त्याची किंमत सहज 8 ते 9 कोटींपर्यंत पोहोचते.
हा चहा तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. तो फक्त वुई पर्वतांच्या कुशीत, निसर्गाच्या निवडक कृपेसह वाढलेल्या विशिष्ट झुडुपांमध्येच तयार होतो. त्यामुळे त्याची किंमत केवळ चवेसाठी नाही, तर त्याच्या दुर्मिळतेसाठी, पारंपरिक वारशासाठी आणि त्यामागच्या चिनी संस्कृतीतील श्रद्धेसाठीही आहे.