भारतात अनेक मोठी राज्यं आहेत, काहींचं क्षेत्रफळ खूप मोठं, काहींची लोकसंख्या प्रचंड. पण या गदारोळात एक असं राज्य आहे जे सर्वात छोटं असूनही अनेक बाबतीत देशात अग्रेसर ठरतं.हे राज्य म्हणजे गोवा. आपल्याला मुख्यतः समुद्रकिनाऱ्यांसाठी, सुंदर सजीव निसर्गासाठी आणि पर्यटकांच्या आकर्षणासाठी गोवा माहीत आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की संपूर्ण देशात गोवा हे एकमेव राज्य आहे जिथे फक्त दोनच जिल्हे आहेत?
भारताचा प्रशासनिक आराखडा अतिशय रचना केलेला आहे. 28 राज्यं आणि 7 केंद्रशासित प्रदेशं, आणि प्रत्येक राज्यामध्ये अनेक जिल्हे, तालुके, गावं. पण या सगळ्यांमध्ये गोवा मात्र एक विशेष अपवाद ठरतो. कारण गोव्यात केवळ दोन जिल्हे आहेत. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा. आणि हे विशेष केवळ आकड्यापुरतं नाही, तर यामागे एक ऐतिहासिक, सामाजिक आणि आर्थिक महत्त्वही आहे.
गोव्याचे क्षेत्रफळ आणि वैशिष्ट्ये
गोवा हे केवळ क्षेत्रफळानं लहान नाही, तर हे भारतातलं सर्वात शेवटी स्वतंत्र झालेलं राज्यही आहे. भारत स्वतंत्र झाला 1947 मध्ये, पण गोवा मात्र 1971 पर्यंत पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं. तब्बल 27 वर्षांनी ते भारतात विलीन झालं. ही गोष्टी ऐकताना काहीशी कल्पनाही करवत नाही, पण गोव्याचं वेगळेपण इथूनच सुरू होतं.
इतक्या लहान आकाराचं असूनही, गोवा संपूर्ण देशात एक वेगळी ओळख तयार करतो. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत गोवा आज भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, गोव्यातील प्रत्येक व्यक्तीचं सरासरी उत्पन्न वर्षाला 3.57 लाख रुपये आहे. म्हणजेच गोवा महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू यांसारख्या मोठ्या राज्यांनाही आर्थिक दृष्टिकोनातून टक्कर देतो.
गोव्याची अर्थव्यवस्था
यामागचं मुख्य कारण म्हणजे गोव्याची पर्यटकांवर आधारित अर्थव्यवस्था. देशातल्या आणि परदेशातल्या लाखो लोकांसाठी गोवा एक स्वप्नवत ठिकाण आहे. सूर्यास्ताच्या साक्षीनं समुद्रकिनाऱ्यावर घालवलेले क्षण, ताजी कोळंबी करी, किंवा फोर्ट अगोड्याच्या भिंतीवरून दिसणारं विस्तीर्ण सागर..गोव्यात प्रत्येकालाच काही ना काही सापडतं. आणि हीच आकर्षणं गोव्यातील स्थानिकांना चांगल्या रोजगाराच्या संधी देतात.