राजस्थानच्या कोरड्या माळरानात, एका उंच डोंगरावर वसलेलं एक मंदिर आहे, जे पाहताच मनाचा ठाव जातो. हे आहे हर्षनाथचं प्राचीन शिवमंदिर. श्रावण महिना सुरू होताच इथे “हर हर महादेव”चा घोष आसमंत भरून टाकतो. जणू काही देव आणि निसर्गाची युती झाल्यासारखी, ही जागा श्रद्धा, इतिहास आणि सौंदर्याचं अनोखं मिश्रण आहे. हे मंदिर केवळ शिवभक्तांसाठी पवित्र स्थान नाही, तर एक अशी जागा आहे जिथे काळ थांबलेला वाटतो, आणि मन एखाद्या अध्यात्मिक प्रवासावर निघून जातं.

‘राजस्थानचं केदारनाथ’
सिकर जिल्ह्यातील हर्ष पर्वतावर वसलेलं हे मंदिर ‘राजस्थानचं केदारनाथ’ म्हणूनही ओळखलं जातं. इथं पोहोचणं म्हणजे एखाद्या तपस्येसारखं आहे. सुमारे 3,100 फूट उंचीवर असलेला हा डोंगर पार करताना खडकाळ चढण, खोल दर्या आणि दमछाक करणारा मार्ग पार करावा लागतो. पण एकदा का तुम्ही मंदिराजवळ पोहोचलात, की साऱ्या थकव्याला विसरून जाता. समोर उभा ठाकलेला शिवमंदिराचा प्राचीन परिसर आणि भोलेनाथाची प्रसन्न मूर्ती पाहून मन पूर्णपणे शुद्ध झाल्यासारखं वाटतं.
हर्षनाथ मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर ते एक ऐतिहासिक वारसाही आहे. अनेक इतिहासकारांचं म्हणणं आहे की, मुघल बादशाह औरंगजेबाच्या काळात त्याच्या सैन्याने या मंदिराला नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. आजही मंदिराच्या काही भग्नावशेषांमध्ये त्या विध्वंसाचे पुरावे दिसतात. पण भक्तांची श्रद्धा कधीच डळमळली नाही. इतक्या शतकांनंतरही, भोलेनाथ त्या जागी तितक्याच भक्कमपणे विराजमान आहेत आणि भाविकांचा ओघ अजूनही तसाच आहे.
गणेशजींचे अर्धनारीश्वर रूप
या मंदिराची एक खास ओळख म्हणजे येथे असलेले गणेशजींचे अर्धनारीश्वर रूप. जगात हे एकमेव असे मंदिर आहे जिथे गणपतीला अर्धनारीश्वराच्या रूपात पूजलं जातं. या अनोख्या दर्शनासाठी भाविक विशेषत: श्रावण महिन्यात लांबून लांबून येतात. मंदिरात असलेलं पंचमुखी शिवलिंग, जे हजारो वर्षं जुनं असल्याचं मानलं जातं, हे इथलं अजून एक मोठं आकर्षण आहे. शिवलिंगाचा पांढरा रंग, पर्वतावरील वारे, आणि भक्तांच्या ओंजळीतून वाहणारा जल हे सगळं दृश्य एखाद्या देवभूमीसारखं भासतं.
हर्ष पर्वतावरून दिसणारा सूर्योदय आणि सूर्यास्त देखील एक अद्भुत अनुभव देतो. निसर्गाची ती शांतता आणि त्याचवेळी मंदिरात सुरू असलेली भक्तीची गडद भावना ही संगती मनाला एक वेगळीच ऊर्जा देते. खाटूश्यामजीपासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर असलेलं हे मंदिर आजही भक्त आणि पर्यटक दोघांसाठी एक जादुई ठिकाण आहे.