भारतीय रेल्वे म्हणजे स्वस्त आणि सर्वसामान्यांसाठी योग्य प्रवासाचा पर्याय, हे चित्र आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. पण या व्यवस्थेतील एक अत्यंत महागडा, श्रीमंतांसाठी खास असा पर्यायही आहे “महाराजा एक्सप्रेस”. या प्रीमियम लक्झरी ट्रेनचं एकाच तिकीटाचं मूल्य ऐकून तुम्हाला अक्षरशः धक्का बसेल. कारण प्रेसिडेन्शियल सूटमध्ये प्रवास करायचा असेल, तर प्रवाशाला सुमारे ₹20,90,760 म्हणजेच अंदाजे 24,890 अमेरिकन डॉलर्स खर्च करावे लागतात. हे दर आंतरराष्ट्रीय फर्स्ट क्लास एअरलाईनच्या तुलनेतही अधिक आहेत.

“महाराजा एक्सप्रेस”
महाराजा एक्सप्रेस केवळ एक रेल्वे प्रवास नाही, तर ती एक फिरती पंचतारांकित आलिशान हॉटेलसारखी आहे. यामध्ये डिलक्स केबिन, ज्युनियर सुइट , सुइट आणि प्रेसिडेन्शियल सुइट असे चार प्रकार आहेत. या सगळ्या प्रवास श्रेणींच्या तिकिटांची किंमत ₹6.5 लाखांपासून सुरू होते आणि ती ₹20 लाखांपर्यंत पोहोचते. यामध्ये आरामदायक एसी केबिन, बाथटब, प्रायव्हेट डायनिंग एरियाज, शाही आतील सजावट आणि सर्व प्रकारच्या आधुनिक सोयीसुविधांचा समावेश आहे.
या ट्रेनमधून देशी आणि विदेशी पर्यटक भारतातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांचा अनुभव घेतात. राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमधील सुंदर किल्ले, ताजमहाल, रणथंभोरचे जंगल, उदयपूरचे तलाव ही ठिकाणं या प्रवासात पाहायला मिळतात. “द इंडियन स्प्लेंडर” नावाचं एक खास पॅकेज यात दिलं जातं, ज्यात 7 दिवस आणि 6 रात्रींचा 2,724 किलोमीटरचा प्रवास समाविष्ट आहे.
जगातील सर्वात आलीशान ट्रेन
सर्वात विशेष बाब म्हणजे, या प्रवासात फक्त रेल्वेच नाही, तर 5 स्टार हॉटेलमधील निवास, ड्रिंक्स, गाईडेड टूर, खाण्या-पिण्याची चविष्ट मेजवानी, वाहन सुविधा आणि सर्व पर्यटन स्थळांवरील प्रवेश शुल्क देखील समाविष्ट असतो.
म्हणूनच महाराजा एक्सप्रेस ही रेल्वे नसून एक शाही अनुभव देणारी फिरती महालट्रेन आहे, जिचे दरवाजे केवळ श्रीमंत पर्यटकांसाठीच उघडतात. आपल्या देशातील ही लक्झरी रेल्वे जगातल्या सर्वात आलिशान रेल्वेमधील एक मानली जाते.