भारत, हिंदुस्तान, इंडिया नव्हे तर आपल्या देशाचे खरे नाव होते ‘भारतवर्ष’; तुम्हाला यामागील इतिहास माहितेय का?

Published on -

आज आपण आपल्या भारत म्हणतो, काही जण इंडिया म्हणतात, पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या देशाचे सर्वात प्राचीन आणि खरे नाव भारतवर्ष आहे? हे केवळ एक नाव नसून, आपल्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक ओळखीचे प्रतीक आहे. पण या नावात ‘वर्ष’ शब्द कशासाठी वापरला गेला आहे? त्याचा अर्थ काय? चला तर मग, यामागील संपूर्ण इतिहास जाणून घेऊया.

‘भारतवर्ष’नाव कशावरून पडले?

‘भारतवर्ष’ हे नाव दोन भागांपासून तयार झाले आहे ‘भारत’ आणि ‘वर्ष’. ‘भारत’ या शब्दाचा उगम पौराणिक सम्राट भरत यांच्या नावावरून झाला आहे. महाभारत आणि पुराणांमध्ये भरत हे हस्तिनापूरचे पराक्रमी आणि धर्मनिष्ठ सम्राट मानले गेले आहेत. त्यांच्या नावावरून संपूर्ण भूमीला ‘भारत’ नाव दिलं गेलं.

‘वर्ष’ म्हणजे?

संस्कृतमध्ये ‘वर्ष’ या शब्दाचा अर्थ ‘भौगोलिक प्रदेश’ किंवा ‘एक विशिष्ट भाग’ असा होतो. ऋग्वेद आणि पुराणांमध्ये ‘वर्ष’ ही संज्ञा अनेकदा एका विस्तृत प्रदेशासाठी वापरली गेली आहे. म्हणजेच भारतवर्ष अर्थात ‘भरत राजा याच्या वंशाने अथवा प्रभावाने ओळखले जाणारे भौगोलिक क्षेत्र’.

भारताचे हे नाव अगदी प्राचीन काळापासून वापरले जात आहे. ऋग्वेद, विष्णुपुराण, महाभारत, भागवत पुराण यांसारख्या ग्रंथांमध्ये ‘भारतवर्ष’ या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे. विष्णुपुराणात तर भारतवर्षाला “जिथे मानव धर्माचे पालन करतो” असेही वर्णन करण्यात आले आहे.

इतर नावे

अलेक्झांडर जेव्हा भारतात आला, तेव्हा त्याने या प्रदेशाला इंडिका असे नाव दिले. नंतर पर्शियन आणि मुघल सत्ताधीशांनी या भूमीला हिंदुस्तान म्हटले. ब्रिटिश काळात इंडिया हे नाव प्रचलित झाले. परंतु भारतीय लोकांनी भारतवर्ष हे नाव त्यांच्या धार्मिक ग्रंथांमधून आणि परंपरेतून जपून ठेवले.

भारतीय संविधानातील नाव-

भारतीय संविधानात देशासाठी दोन अधिकृत नावे निश्चित करण्यात आली आहेत, ती म्हणजे भारत आणि India. 26 जानेवारी 1950 रोजी जेव्हा संविधान अंमलात आले, तेव्हा ‘India, that is Bharat, shall be a Union of States’ असे म्हटले गेले. त्यामुळे ‘भारत’ हे नाव आजही अधिकृत आहे.

भारतवर्ष हा शब्द आज साहित्य, अध्यात्मिक ग्रंथ आणि ऐतिहासिक चर्चांमध्ये अधिक वापरला जातो. आधुनिक वापरात ‘भारत’ किंवा ‘इंडिया’ ही नावे अधिक प्रचलित झाली आहेत. मात्र, भारतवर्ष हे नाव आपला प्राचीन वारसा आणि अस्मिता अधोरेखित करत राहते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News